आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ठेकेदाराचा पराक्रम : सव्वा लाख ब्रास बेकायदेशीर मुरूम उपसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करणार्‍या ठेकेदाराने माळढोक अभयारण्य परिक्षेत्रातील (उत्तर सोलापूर) 1 हजार एकरहून अधिक जागेत बेकायदेशीरपणे एक लाख 22 हजार 633 ब्रास मुरूम उपसा केल्याचे तपासणीत आढळले आहे. माळढोक परिक्षेत्रातून मुरूम उपसा करण्यास सर्वोच्च न्यायालयाची बंदी आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. त्याच्याकडून कोट्यवधीचा दंड वसूल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, वन्यजीव कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

अभयारण्य परिक्षेत्रातील मुरूम उत्खनास बंदी आहे. असे असतानाही पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी, पाकणी, अकोलेकाटी, कारंबा, बीबीदारफळ येथील वनक्षेत्रातून मुरूमाचा बेसुमार उपसा झाला. महसूल प्रशासनाने नियमित उपसा झाल्याप्रमाणे ठेकेदाराकडून रॉयल्टी भरून घेतली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले. महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ पाठपुरावा केला. आता या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल आल्यानंतर प्रशासन दंडात्मक कारवाईचे नाटक करत आहे. प्रत्यक्षात या प्रकरणी फौजदारी कारवाई उकरण्याची गरज आहे.

..अन् प्रशासन उघडे पडले
बेकायदेशीर मुरूम उपशाच्या चौकशीसाठी कोल्हापुरातून दोन पथके मागवल्याची टिमकी महसूल प्रशासनातर्फे वाजवण्यात आली. पण, प्रत्यक्षात भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयातून फक्त एकच पथक आले होते. त्या शासकीय पथकाने बार्शी व उत्तर तालुक्यातील फक्त दगड खाणींची मोजणी केल्याचे समोर आले. मुरूम उत्खनन झालेल्या काही भागांची मोजणी झाली नसल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाची कोंडी झाली.

अहवालही उशीर आला..
या प्रकरणाची चर्चा सुरू झाल्यानंतर प्रशानातर्फे बीबीदारफळ, गुळवंची व अकोलेकाटी परिसरातील अवैध उपसा झालेल्या परिसराची गूपचूप मोजणी करण्यात आली. तसेच, वरिष्ठ अधिकार्‍यांची परवानगी न घेताच खासगी मशीनद्वारे मुरूम उपशाची मोजणी केल्याचा प्रकारही ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणला. मोजणीनंतर दहा ते पंधरा दिवसांमध्ये अहवाल येईल, असे सांगण्यात आले. पण, प्रत्यक्षात एक महिन्याने त्याबाबतचा अहवाल आला. त्यामध्ये तब्बल एक हजारपेक्षा जास्त क्षेत्रावरील उत्खननामध्ये फक्त एक लाख 22 हजार 633 ब्रास मुरूम उपसा झाल्याचे आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कारवाई सुरू आहे..
मुरूम उपशाची संपूर्ण मोजणी टोटल स्टेशन मशीनद्वारे अत्यंत बिनचूक झाली आहे. त्याबाबतचे संपूर्ण अधिकार तहसीलदार व प्रांत अधिकार्‍यांना असून त्यांना मार्गदर्शन केले आहे. रस्त्यांसाठी कंपनीने संबंधित ठेकेदाराला मुरूम पुरवठय़ाचे दिलेले एकूण उद्दिष्ट, त्याने केलेला पुरवठा व आपल्या हद्दीतून झालेला उपशाची तपासणी करून पुढील कारवाई होईल.’’ शंकरराव जाधव, उपजिल्हाधिकारी, महसूल व खनिकर्म विभाग

अहवाल पाहूनच ठेकेदाराला नोटीस
टोटल स्टेशन मशीनच्या अहवालानुसार संबंधित ठेकेदाराला नोटीस दिली. त्यांच्याकडून खुलासा आलाय. त्यांनी मांडलेली बाजू व दिलेल्या कागदपत्रांची खातरजमा करण्यात येईल. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.’’ अंजली मरोड, तहसीलदार, उत्तर सोलापूर