आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेच्या मास्टर प्लॅनचा प्रस्ताव आता बोर्डकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानकशेजारी असलेल्या मालधक्क्याच्या जागेत नवीन आरक्षण केंद्र आणि प्रवाशांसाठी अन्य सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी सोलापूर विभागाने दिलेला दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव आता मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडून रेल्वे बोर्डकडे पाठवण्यात आला. तसेच फलाट एकवरील कव्हर शेड प्रस्तावाचा निर्णयही रेल्वे बोर्डकडून घेण्यात येणार आहे.

सोलापूर विभागाने या दोन्ही प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर तो मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे पाठवण्यात आला होता. मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांनी यास मंजुरी दिली नाही. त्यामुळे सोलापूर रेल्वे विभागाने तो प्रस्ताव रेल्वे बोर्ड (नवी दिल्ली) येथे पाठवला. नवीन आरक्षित तिकीट खिडक्या, प्रवाशांसाठी वेटिंग हॉल, चारचाकी व दुचाकीसाठी वाहनतळ व्यवस्था आदी कामे केली जाणार आहेत. दोन्ही कामाच्या पूतर्तेसाठी चार कोटी खर्च अपेक्षित आहे. यावर जूनपर्यंत निर्णय अपेक्षित असल्याचे वरिष्ठ विभागीय दळणवळण व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी सांगितले.

कुर्ला एक्स्प्रेसमधून सहा तोळ्यांचे दागिने लंपास
कुर्ला-कोइम्बतूर एक्स्प्रेसने पुट्टपुर्थीहून कल्याणला जाणार्‍या महिलेचे सहा तोळ्यांचे दागिने चोरीला गेले. ही घटना मंगळवारी वाडी ते सोलापूर दरम्यान घडली. उमा जयकुमार (वय 62, अंबरनाथ) यांनी फिर्याद दिली.

प्रवाशांना आवाहन
विशेषत: एकटे प्रवास करणार्‍या महिलांनी प्रवासात आपल्यासोबत शक्यतो कमीत कमी सामान बाळगावे. रात्रीच्या प्रवासादरम्यान काळजी घ्यावी. काही प्रवासी गाडीचे दरवाजे व खिडक्या रात्रीच्या वेळी उघडे ठेवतात. यामुळे चोरांना आयती संधी मिळते. रात्री खिडक्या व दरवाजे शक्यतो बंद ठेवावेत, असे आवाहन रेल्वे पोलिस दलाचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त गोविंद देवकर यांनी केले.