आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची रेंज कमी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर रेल्वे स्थानकावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची रेंज कमी आहे. त्यामुळे लोकांचे चेहरे त्यात व्यवस्थित पकडले जात नाहीत. बेवारस तान्हुली व विक्रेत्यांची अधिकार्‍यांनी केलेली मारहाण या दोन्ही प्रकरणाच्या निमित्ताने हे स्प्पष्ट झाले आहे.

मागील वर्षी सोलापूर रेल्वे स्थानकावर सहा ते सात लाख रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. स्थानकावर फलाट क्रमांक एक ते फलाट क्रमांक पाचपर्यंत कॅमेरे बसविण्यात आले. असे असले तरीही कॅमेर्‍यांची रेंज अधिक नसल्याने अनेक गुन्हेगार रेल्वे प्रशासनाच्या तावडीतून सुटून जात आहेत. स्थानकावरील सुरक्षा ही रेल्वे पोलिसांची जबाबदारी आहे. मात्र, त्याच्यांकडूनच सुरक्षेला हरताळ फासला जात आहे. दोनच दिवसांपूर्वी फलाट एकवर अज्ञात महिला 20 दिवसांच्या तान्हुलीला वार्‍यावर सोडून पसार झाली. पाहणार्‍यांच्या सांगण्यावरून ती महिला हिरवी साडी नेसलेली होती. शोध घेण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने केला खरा, मात्र हाती काहीच लागले नाही. कारण ती महिला कॅमेर्‍याच्या रेंजच्या बाहेर होती. दरम्यानच्या काळातही रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यास अनधिकृत विक्रेत्यांनी मारहाण केली. मारहाण करणारा कोण होता याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर तोही रेंज बाहेर होता. त्यामुळे त्यालाही शोधता आले नाही. दुर्दैवाने स्थानकावर एखादी दुर्घटना घडली तर या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा उपयोग काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रेल्वे स्थानकावर 22 कॅमेरे
रेल्वे स्थानकावर एकूण 22 कॅमेरे आहेत. प्रत्येक फलाटवर 4 कॅ मेरे आहेत. एक कॅमेरा आरक्षण केंद्रात आहे. दुसरा स्थानकाबाहेरच्या परिसरात आहे. तरीही आतापर्यंत याचा फारसा उपयोग झालेला नाही. फलाट एकवर याचे नियंत्रण कक्ष आहे. येथे 24 तास रेल्वे पोलिस तैनात असतात. सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी 15 कॅमेर्‍यांची गरज आहे.

येथे हवेत कॅमेरे
स्थानकावर दोन पादचारी पूल आहेत. एक वाडीकडचा, तर दुसरा पुण्याचा दिशेचा. या दोन्ही पादचारी पुलांवर रोज हजारो प्रवासी येतात-जातात. दरम्यानच्या काळात पादचारी पुलावरून सकाळी महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी पळविण्यात आली. या ठिकाणी कॅमेरे नसल्याने त्या चोराचा शोध लागला नाही. या दोन्ही पादचारी पुलांवर कॅमेरा बसविण्याची नितांत गरज आहे. तसेच स्थानकावरून आत प्रवेश करताना चौकशी कार्यालयाचा भाग, चालू तिकीट खिडक्यांचा भाग येथेही कॅमेरा लावलेला नाही.

''स्थानकावरील सुरक्षा हा रेल्वे पोलिस दलाच्या अखत्यारीत येणारा विषय आहे. यासाठी रेल्वे पोलिस खात्यातूनच निधी देण्यात येतो. स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थानकावर आणखी कॅमेरे बसविण्यात यावेत, असे पत्र रेल्वे प्रशासनाने रेल्वे पोलिसांच्या विभागीय आयुक्तांना दिले आहे.’’
-सुशील गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, सोलापूर रेल्वे