आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामवाडीच्या बाजूला उपस्थानक, सहा, सात, आठ फलाट शक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानकावरून सुमारे पंचवीस हजार प्रवाशांची दररोजची ये-जा आहे. रोज 98 प्रवासी गाड्या स्थानकावरून धावतात. वाडी, अक्कलकोटला उभारणार्‍या सिमेंट कंपन्या, एनटीपीसीचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असे सर्व लक्षात घेता सोलापूर रेल्वे स्थानक येत्या काही दिवसांत फार व्यस्त होणार आहे. त्यामुळे रेल्वस्थानकाचा विस्तार करण्याची गरज आहे. असा प्रस्ताव नसला तरी रेल्वे प्रशासन याचा विचार करू शकते.

स्थानकावर असलेल्या पिटलाइनच्या पाठीमागे रेल्वेचा खूप मोठा मालधक्का आहे. सुमारे 10 हजार टन पोती याची साठवण क्षमता आहे. हा अन्यत्र हलवून तेथे फलाट सहा, सात, आठ फलाटाचे बांधकाम होऊ शकते. याला प्रवेश आपण रामवाडीच्या बाजूनेदेखील देऊ शकतो. तसेच स्थानकावरील पादचारी पुलावरूनदेखील सहजपणे जाऊ शकतात. ईस्ट आणि वेस्ट असे स्थानकाचे दोन भाग पाडणे शक्य आहे. दोन खिडक्यांचे आरक्षण केंद्र, करंट तिकीट खिडकी, प्रशस्त पार्किंगची व्यवस्था रेल्वे प्रशासन सहजपणे उपलब्ध करून देऊ शकते.

असे झाल्यास काय फायदा
रामवाडीच्या दिशेने प्रवेश दिल्यास स्थानकासमोरील गांधी चौकात होणारी वाहतुकीची कोंडी मिटेल. दमाणीनगर परिसरात नवे नवे गृहप्रकल्प उभे राहत आहे. त्यामुळे नागरिकांची वस्ती येथे दाट होणार हे निश्चित. या सर्वांना स्थानकावर यावयाचे असल्यास त्यांना पुलावरून भय्या चौक आणि रेल्वे स्थानक असे यावे लागते. रामवाडीच्या दिशेने प्रवेश दिल्यास या सर्वांचा वळसा व वाहतुकीचा ताण वाचेल.

अन्य तीन फलाटे झाल्यामुळे मेल एक्स्प्रेस सह अन्य रेल्वे गाड्यांना विशेष मालगाड्यांची चांगली सोय होईल. गाड्यांना आऊटरला थांबावे लागणार नाही. शंटिंगसाठीदेखील वेळ लागणार नाही. त्यांना देखील लाइन उपलब्ध होईल.