आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर: निधीच्या कमतरतेचा प्रवाशांना ‘चटका’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक एकचे जोशात विस्तारीकरण झाले. थाटात त्याचे उद्घाटन झाले. मात्र, विस्तारीत भाग ओका-बोकाच राहिला आहे. त्या भागावर छत नसल्याने प्रवाशांना ऊन-पावसाचा मारा सहन करावा लागणार आहे. निधी नसल्याने फलाटावरील छताचे काम होऊ शकलेले नाही.

सोलापुरात आतापासूनच उन्हाळा जाणवत आहे. त्याचे चटके ही सोलापूरकरांना बसत आहे. सोलापूर रेल्वे विभागाने रेल्वे सरव्यवस्थापक सुबोध जैन यांच्या विशेष कोट्यातून दोन कोटी रुपये मंजूर करून घेत फलाटाचे रुंदीकरण केले. मिळालेला सर्व निधी विस्तारीकरणासाठी, सिग्नल यंत्रणा नव्याने बांधण्यासाठी, आदी कामांसाठी खर्च करण्यात आला. त्यामुळे फलाटावर छप्पर बांधण्यासाठी पैसा शिल्लक राहिला नाही. इंद्रायणीची वेळ ही दुपारची आहे. या गाडीचे वातानुकूलितचे दोन डबे व अन्य साधा डबा हा उघड्यावरच येतो. प्रवाशांना उन्हात उभे राहूनच गाडीत प्रवेश करावा लागतो. तसेच प्रवाशांना सोडण्यासाठी फलाटावर येणार्‍या लोकांना उन्हातच उभे राहावे लागत आहे.

छपरासाठी दोन कोटींची गरज : फलाटाची लांबी 150 मीटरने वाढवण्यात आली आहे. त्याप्रमाणे आता 150 मीटरचे छप्पर (शेड) बांधावा लागणार आहे. यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची गरज असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. या निधीसाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करणार आहे.

तोकडी सुविधा : सध्या फलाटावर तीन नवे बटरफ्लाय शेड बांधण्यात आलेले आहेत. यापैकी प्रत्येक शेडमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी एक बेंच ठेवण्यात आले आहेत. एका शेडमध्ये सात ते आठ प्रवासी बसू शकतात. मात्र, स्थानकावरील प्रवाशांची संख्या लक्षात घेता हे अत्यंत तोकडे पडत आहे. कव्हर शेड सोडता रेल्वे प्रशासनाकडून फलाटावर कोच इंडिकेटर, अनॉसमेंट स्पिकर व पिण्याचे पाण्याची सोय करण्यात आली आहे.

छपरासाठी निधी नाही
रेल्वे विभागाच्या दृष्टीने सर्वप्रथम फलाटाचे विस्तारीकरण होणे गरजेचे होते. त्यानुसार ते करण्यात आलेले आहे. कव्हर शेडसाठी सोलापूर रेल्वे विभागाकडे निधी नाही. येत्या आर्थिक वर्षात विभाग निधीचा प्रस्ताव मध्य रेल्वेला देणार आहे. निधी मंजूर होताच लागलीच कव्हर शेड बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
-सुशील गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, सोलापूर रेल्वे