सोलापूर- सोलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून मागणी होताच त्यांना सिगारेट आणि दारूच्या बाटल्या उपलब्ध करून देण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कमी वेळेत चांगला आर्थिक मोबदला मिळत असल्याने रेल्वे स्थानकावर अनधिकृत विक्रेत्यांकडून हा प्रकार सुरू आहे. स्थानकावरून धावणार्या लांबपल्ल्यांच्या गाड्यांत हा प्रकार सर्रास सुरू आहे.
वातानुकूलित डब्यातील ज्या प्रवाशांना दारू प्यायची असते, ते गाडीतील बेडरोलवाल्याशी संपर्क वाढवतात. प्रवास लांबचा असल्याने त्यांचा गाडीतच संपर्क वाढतो. मागणी आल्यावर बेडरोलवाले स्थानकावरच्या अनधिकृत विक्रेत्यांना मोबाइलवर संपर्क साधून दारू उपलब्ध करून देतात. फलाट तीन, चार व पाच क्रमांकावरच्या गाड्यांत असे प्रकार सर्रास घडतात. लांबपल्ल्यांच्या गाड्यांत सोलापूरच्या स्थानकावर शौचालयासाठी पाणी भरण्याचे काम होते. यासाठी किमान वीस ते पंचवीस मिनिटांचा थांबा असतो. पाणी बाटल्यांची विक्री करणारे अथवा वडा-पाव विकणारे आपली दुचाकी गांधी चौकातील बंद मालधक्याच्या ठिकाणी लावतात. दुचाकीवरून स्थानक परिसरातील वाइन शॉपमधून दारू आणली जाते.