आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियम धाब्यावर; रेल्वे ट्रॅक आला धोक्यात; परवानगीविनाच लोहमार्गाखाली जलवाहिनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- आसरा येथे रेल्वे पुलाजवळ सोलापूर ते होटगी नवीन दुहेरी रेल्वे लोहमार्गखाली महापालिकेने जलवाहिनी टाकली आहे. रेल्वेची परवानगी न घेताच ही जलवाहिनी टाकण्यात आली आहे. रेल्वे लोहमार्गखाली जलवाहिनी करण्याचे ठरलेले निकष असताना महापालिका प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून हे काम केले. त्यामुळे भविष्यात रेल्वे लोहमार्गला मोठा धोका उद्भवण्याची शक्यता रेल्वे वरिष्ठ अधिकार्‍यांकडून व्यक्त होत आहे. महापालिकेने मात्र कानावर हात ठेवले आहेत.

रेल्वे लोहमार्गाखाली एखादी केबल अथवा जलवाहिनी टाकता येऊ शकते. मात्र, त्यासाठी रेल्वे प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे. लोहमार्गाच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेची विशिष्ट नियमावली आहे. नियमावलीचे पालन होण्यासंबंधीची संपूर्ण माहिती घेऊनच रेल्वे प्रशासन परवानगी देते. मात्र, येथे महापालिकेने अनागोंदी कारभार करून रेल्वेची परवानगी न घेताच जलवाहिनी टाकली. या जलवाहिनीतून बाहेर पडणारे पाणी बर्‍याचदा लोहमार्गाच्या स्लिपरवर साचते. यामुळे स्लिपर कमकुवत होण्याचा धोका मोठा आहे. यातून एखादा रेल्वे अपघातही घडू शकतो. त्यामुळेच वेळीच यावर उपाययोजना व कारवाई झाली पाहिजे.

महापालिकेला दोन पत्र
यासंदर्भात सोलापूर रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत सोलापूर महापालिकेला दोन पत्र पाठवले. हे काम बेकायदा असून ते तत्काळ थांबवावा असे सांगितले आहे. महापालिकेने नेहमीप्रमाणे याला केराची टोपली दाखवली आहे.

नाला बनवण्याचे काम
या लोहमार्गच्या बाजूला काही अंतरावर सध्या नाला तयार करण्याचे काम महापालिका करत आहे. नाल्यासाठी रेल्वे प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही. नाल्याचे पाणी पुढे कोठे सोडणार हे रेल्वेला सांगणे गरजेचे आहे. असे असताना रेल्वेला कुठलीच माहिती दिली नाही.

एका किलोमीटरसाठी 6 कोटी
लोहमार्गाच्या मजबुतीवर रेल्वे सुरक्षा अवलंबून आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन लोहमार्ग टाकण्यापासून देखभालपर्यंत मोठय़ा प्रमाणात पैसा खर्च करते. एक किलोमीटरचा लोहमार्ग टाकण्यासाठी रेल्वेचे 6 कोटी रुपये खर्च होतात. एका किलोमीटरमध्ये 1565 स्लिपर टाकण्यात येतात.

अत्यंत गंभीर प्रकार
>हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. महापालिकेने रेल्वेची परवानगी घेणे गरजेचे असताना ती न घेताच काम केले आहे. या संदर्भात महापालिका आयुक्तांसोबत लवकरच चर्चा करणार आहोत.’’
-सुशील गायकवाड, वरिष्ठ वाणिज्य विभागीय व्यवस्थापक

>रेल्वे लोहमार्गाखालून टाकलेल्या जलवाहिनी बद्दल मला काहीही माहीत नाही. मी यासंदर्भात काहीही बोलणार नाही.’’
-बी. एस. आहिरे, सार्वजनिक आरोग्य अभियंता