Home »Maharashtra »Western Maharashtra »Solapur» Solapur Red Light Area Raid Issue

कुंटणखाना प्रकरण : चार पथकांची नियुक्ती, मुख्य दलालाचे बँक खाते सील

प्रतिनिधी | Jul 25, 2012, 11:06 AM IST

सोलापूर/दक्षिण सोलापूर - नोकरीचे आमिष दाखवून बांग्लादेशातील तरुणींना कुंटणखान्यात पाठविणार्‍या दलालांच्या व एकूण प्रकरणाच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली आहेत. यातील दोन पथके कल्याण व मुंबईला मंगळवारी रवाना झाली असून बांग्लादेशाला जाण्यासाठी परवाना मिळाल्यानंतर त्या देशासह कोलकात्याला दोन पथके जाणार असल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर-विजापूर महामार्गावरील नांदणी येथील शिवम ढाब्यावर रविवारी रात्री कारवाई करून सातजणांना अटक झाली. तर नोकरीचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलेल्या सात बांग्लादेशी तरुणी व एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. सात आरोपींना न्यायालयाने 29 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे तर मुलींना सुधारगृहात पाठविले आहे. बांग्लादेशी तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करण्यास लावणारे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. या मुलींना बांग्लादेशहून कोलकातामार्गे मुंबईत (कल्याण) आणले जाते. नंतर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील वेगवेगळ्या महामार्गावरील ढाब्यावरच्या कुंटणखाण्यात पाठविले जाते.

मंद्रूप परिसरात अवैध व्यवसाय
नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील ढाब्यावर सुरू असलेला वेश्याव्यवसाय तेथील एका पीडित मुलीच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या मंद्रूप पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध व्यवसायांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. कंदलगाव परिसरातील ढाब्यांवर बनावट दारू, वेश्या व्यवसाय खुलेआम चालतात. त्याचपद्धतीने नांदणी ते टाकळी मार्गावर सुरू आहेत. येथील चार दोन ढाबाचालकांकडे ते चालवण्याचा परवाना आहे. पण, त्याकडे अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांचे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. मंद्रूप परिसरात जुगाराचे अड्डे आहेत. सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकातून अनेकजण आलिशान गाड्यांमधून येथे जुगार खेळण्यासाठी येतात. तसेच, ऑर्केस्ट्राबारच्या नावाखाली डान्सबार सुरू असल्याची चर्चा असून, त्याकडेही पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. वाळूच्या अवैध वाहतुकीबरोबर शासकीय धान्य, रॉकेलची काळ्याबाजारात विक्री करणार्‍यांकडे दुर्लक्ष होत आहे.

जिल्ह्यातील ढाब्यांची तपासणी
जिल्ह्यातील विजापूर, पुणे, हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरील आणि तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, वागदरी, बार्शी, तैरामैल या मुख्य मार्गावरील ढाब्यांची तपासणी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकर्‍यांना आदेश दिल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली. नुसते ढाबेच नव्हे तर त्या परिसराची पाहणी होईल. ढाब्याचा परवाना आहे का, मद्य विक्रीस परवानगी आहे का याची पाहणी होईल. बेकायदेशीर ढाब्यांवर कडक कारवाई होईल. नांदणी ढाब्यावरील घटनेचा तपास करण्यासाठी कोलकात्याला आमचे पथक रवाना झाले असून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. ढाब्यावरील अवैध धंदे बंद करण्यासाठी खास पथके नेमली आहेत.

चार पथके तयार
पोलिस अधीक्षक राजेश प्रधान यांनी तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा व इतर अधिकार्‍यांची चार पथके तयार केली आहे. प्रत्येक पथकात दोन अधिकारी व सहा पोलिस शिपाई असतील.

एजंटाचे बँक खाते सील
बांग्लादेशच्या तरुणींना कोलकात्यामार्गे मुंबईला कुंटणखान्यात पाठविणार्‍या चार दलालांची नावे निष्पन्न झाली आहेत. या मुलींना नोकरीचे आमिष दाखवून या व्यवसायात आणणारा इम्रान ऊर्फ इमाम शेरअली शेख (रा. बिझियारा, बांग्लादेश) हा मुख्य एजंट आहे. त्याचा मेव्हणा अब्दुल हुसेन शेख (रा. मिरपूर, ढाका) हा तरुणींकडून रक्कम गोळा करून इम्रान शेख याच्या बँक खात्यावर जमा करीत होता. मंद्रूप पोलिसांनी संबंधित बँकेला इम्रानचे खाते सील करण्यास सांगितले आहे.

Next Article

Recommended