आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात जाऊन केली तिघा चोरट्यांनी जंगी पार्टी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील दयानंद महाविद्यालय चौकात 22 जानेवारी रोजी कुरिअर चालक जयेशकुमार ओझा यांच्याजवळील बारा लाख रुपये घेऊन पळून गेल्यानंतर तिघांनी थेट कोल्हापूर गाठले. तेथील लक्ष्मीपुरी भागातील एका हॉटेलात जंगी पार्टी केली. त्यानंतर नगर, टेंभुर्णी, होटगी परिसरात ते फिरत होते. गुन्हे शाखेला याची कुणकुण लागताच मंगळवारी पहाटे तिघांना अटक केली.

मारुती भुजंग कांबळे (वय 23, रा. भैरव वस्ती, सोलापूर), वीरेंद्र प्रतापसिंह दोडतल्ले (वय 23, रा. भूषणनगर, सोलापूर), वीरपाल नागनाथ घोडकुंबे (वय 23, रा. भैरव वस्ती, सोलापूर) या तिघांना अटक करून दुपारी मुख्य न्यायदंडाधिकारी वैभव जाधव यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यातील दोघेजण आयटीआय तर एकजण बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला आहे. तिघांजवळील पाच लाख 80 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. एकूण बारा लाखांपैकी सात लाख वीस हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. मुख्य सूत्रधार सुधीर सलगर, व्यापारी जितेंद्र पाटील या दोघांना रविवारी अटक करण्यात आली आहे. आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत, असे साहाय्यक पोलिस निरीक्षक तय्यब मुजावर यांनी सांगितले.

असा झाला प्लॅन

वीरेंद्र हा मार्केट यार्डात थांबून ओझा केव्हा ये-जा करतात याची टेहळणी करीत होता. घटनेदिवशी त्यानेच समोरील चौकातील साथीदारांना टीप दिली. यानंतर सुधीर सलगर, मुकुंद जवळकर, मारुती कांबळे, वीरपाल घोडकुंबे यांनी जुना बोरामणी नाका येथून ओझा यांचा पाठलाग सुरू केला. दयानंद महाविद्यालयाजवळ काम फत्ते केले. ही बाब तपासात निष्पन्न झाल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली. आरोपी सलगर व पटेल यांच्यातर्फे अँड. विद्याधर पांढरे तर सरकारतर्फे अँड. मिलिंद दातरंगे यांनी काम पाहिले.

या पथकाने केली कारवाई

साहाय्यक निरीक्षक तय्यब मुजावर, हवालदार अंबादास राठोड, शिवाजी माने, संजय हुंडेकरी, उमाजी चव्हाण, काशिनाथ सोनवणे, सचिन गायकवाड, दत्तात्रय बन्ने, शालम मुजावर, दीपक डोके, अमोगसिद्ध जमादार, बाळासाहेब कोबरणे, मल्लिकार्जुन चमके, फिरोज जमादार, सुधीर गावडे, चालक भंडारी, नरेश कामूर्ती, सातपुते यांच्या पथकाने ही कारवाई केली.