आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओने काढल्या 21 शोरूम्सना नोटिसा; वाहन विक्रीचा तपशील मागवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या किमती आणि भरलेला कर याचा तपशील सोमवारपर्यंत जमा करण्याची नोटीस सोलापूर उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) काढली. शहर आणि जिल्ह्यातील 21 शोरूमना नोटिसा काढल्याचे सांगण्यात आले.

काही वर्षांपासून सोलापुरात दुचाकी व चारचाकी गाड्यांचे विक्रेते कर भरताना शासनाची दिशाभूल करत असल्याचे पुढे आले आहे. गाडीच्या एकूण रकमेवर आरटीओकडे कर न भरता गाडीच्या निव्वळ रकमेवर कर भरून फसवणूक झाल्याचे प्रकरण ‘दिव्य मराठी’ने उघड केले होते. त्यानंतर आरटीओने कडक भूमिका घेत नोटीस काढली. वाहन विक्रेत्यांना गाडीच्या तपशीलासह त्याच्या किमतीचा तपशील जमा करावा लागणार आहे. यात कोण्या विक्रेत्यांनी कर चुकवेगिरी केल्याचे आढळले तर त्यांना ते अंगलट येणार आहे.

सोलापूर आरटीओ कार्यालयाचे संगणकीकरण 22 जुलै 2008 रोजी झाले. तेव्हापासून आजपर्यंत किती वाहनांची विक्री झाली, त्याच्या किमती, क्रमांक याची इत्यंभूत माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत विक्री झालेल्या वाहनांची माहिती मागवण्यात येत आहे. विक्रेत्यांनी आरटीओकडे जमा केलेली पावती व ग्राहकांना देण्यात आलेली पावती याची खातरजमा आरटीओ करणार आहे. कर चुकवले असल्याचे सिद्ध झाल्यास आरटीओ दंडात्मक कारवाई करतील.

नियम काय सांगतो...
गाडी आरटीओकडे नोंद करताना काही विक्रेते केवळ उत्पादन किमतीवर सात टक्के कर भरतात. मोटार वाहन कायद्यानुसार गाडीच्या उत्पादन किमतीमध्ये व्हॅट, एलबीटी आदीकरांचा समावेश करून तयार होणाºया एकूण शोरूमच्या किमतीवर सात टक्के कर भरणे गरजेचे आहे. सोलापुरात याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने आरटीओ कार्यालयाचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडत आहे.

यातून काय होणार साध्य
गेल्या पाच वर्षांपासून नियमाप्रमाणे कर न भरता गाडीच्या निव्वळ रकमेवर कर भरला का, किती गाड्यांसाठी किती रुपयांचा कर चुकवला, हे स्पष्ट होईल. तसेच विक्रेत्यांनी या संदर्भात महापालिकेला भरावा लागणारा एलबीटी भरला की नाही, तेही स्पष्ट होईल.
गाडी विक्रेत्यांना वाहनांच्या किमती, तपशीलसह सोमवारपर्यंत आरटीओकडे जमा करण्याची नोटीस दिली आहे. यातील दोषींवर प्रति माह 2 टक्के प्रमाणे व्याज व जेवढ्या किमतीचा कर चुकवला तो वसूल करण्यात येणार आहे.
- दीपक पाटील, आरटीओ

नोटीस मिळालेली नाही. आम्ही आरटीओच्या नियमाप्रमाणे कर भरतो. ग्राहकांना जी पावती देतो तीच पावती आम्ही आरटीओकडे कर भरण्यासाठी सादर करतो. नियमाप्रमाणे एकूण किमतीवरच कर भरतो.
- विष्णू मोंढे, मोंढे ऑटोमाबाइल्सचे मालक