आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभागृह नेतेपदासाठी दोन माजी महापौरांची नावे चर्चेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिकेचे सभागृह नेते महेश कोठे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे पद रिक्त होणार आहे. काँग्रेसमधील इच्छुकांनी या पदासाठी फिल्डिंग लावली आहे. पालिकेतील निर्णयाबाबत आतापर्यंत विष्णुपंत कोठे व परिवार यांना विश्वासात घेऊन होत असत. त्याची शक्यता आता मावळली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे निर्णय व्यवस्था असणार आहे. माजी महापौर संजय हेमगड्डी व आरिफ शेख यांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचे समजते. हे दोघे आमदार प्रणिती शिंदे यांच्या शहर मध्य विधानसभा मतदार संघातील आहेत. याशिवाय अनुक्रमे मोची आणि मुस्लिम समाजतील आहेत. या दोन्ही समाजाचे शहर मध्य मध्ये प्राबल्य आहे.

कोठे गटाचे 13 नगरसेवक
महेश कोठे यांच्या गटाचे 13 नगरसेवक असल्याचे समजते. यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. या पदावरून ते नाराज होऊन बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देवेंद्र कोठे, कुमूद अंकाराम, विनायक कोंड्याल, विठ्ठल कोटा, निर्मला नल्ला, श्रुती मेरगु, सुनंदा बल्ला हे कोठेंच्या गटातील समजले जातात. याशिवाय अन्य नगरसेवकही या गटात असून त्यांनी नावे सांगण्यास नकार दिला.

‘शहर मध्य’मध्ये संबंधच नाही : यलगुलवार
‘महेश कोठे यांचा शहर मध्य मतदारसंघात काहीच संबंध नाही. त्यामुळे ते विधानसभा निवडणुकीला शिवसेनेकडून उभे राहिले तरी काहीही फरक पडणार नाही, असा दावा शहराध्यक्ष प्रकाश यलगुुलवार यांनी केला. कोठे यांचे पद काढून घेणे व शिस्तभंगाची कारवाई प्रदेश काँग्रेस उद्या करेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

यलगुलवार यांनी सांगितले की, सभागृहनेतेपदाची निवड ही प्रदेश कमिटीकडून होत असते, त्यामुळे प्रदेश काँग्रेस उद्या त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेईल, नवीन सभागृहनेता निवडला जाईल. त्यांच्या जाण्याने पक्षावर फारसा परिणाम होणार नाही. तरीही कोणी जात असेल तर त्यांना थोपवणे आणि पक्ष आणखी मजबूतकरण्यावर भर देण्यात आला आहे.

महाालिकेच्या सत्तेवर काय परिणाम होईल हे अत्ताच सांगता येणार नाही, कायद्याच्या कचाट्यात समर्थक नगरसेवक अडकले आहेत, त्यामुळे कितीजण त्यांच्यासोबत जातात हे स्पष्ट झाल्यानंतरच मनपातील सत्तेबाबतचा निर्णय होईल. शहर मध्य मतदारसंघ हा सर्व जाती, धर्मांचा आहे. तेथे कोणा एका जातीचा म्हणून उमेद्वार कधी निवडून आलेला नाही. शिवाय महेश कोठे यांचा तर या मतदारसंघात तसा काहीच संबंध नाही. ते या मतदारसंघात राहातही नाहीत. मतविभागणी किती होईल हेही सांगता येणार नाही. मतदारसंघात पिढ्यान्पिढ्या काँग्रेससोबत राहणारा वर्ग आहे, या विधानसभा निवडणुकीतही तो राहील, असा दावाही यलगुलवार यांनी केला.
माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे शहर मध्य मतदारसंघातील प्रभाग व विभागनिहाय कार्यकर्ते, पक्ष प्रमुखांना बोलावून आढावा घेत आहेत. बुधवारी सकाळी ते सिध्देश्वर एक्स्प्रेसने सोलापुरात आले. कोण कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामागे किती ताकद आहे, लोकसभा, मनपा निवडणुकीत झालेले मतदान कसे होते, यावेळी काय चित्र राहील याचा तपशीलही घेत आहेत. कोठे शिवसेनेत जाणार या शक्यतेमुळे गेल्या आठवड्यातही शिंदे यांनी शहरातील काही भागांचा असाच आढावा घेतला होता.