आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्तुत्य कार्य: आईच्या स्मरणार्थ शाळेला दिले 11 लाख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- तेलंगण भागातील माझ्या आईचे वयाच्या नवव्या वर्षी लग्न झाले. वडिलांचे वय होते चौदा उपजीविकेसाठी त्यांनी सोलापूर गाठले. छोटी-मोठी कामे करीत त्यांचा संसार सुरू झाला. पाच मुली झाल्या आणि एक मुलगा म्हणजे मी. आई निरक्षर असूनही आम्हा सर्वांना शिक्षित केले. अशा आदर्शमातेच्या नावाने शाळा असावी, त्यात मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे, अशी इच्छा होती. त्याच इच्छेने पद्मशाली शिक्षण संस्थेला 11 लाख रुपयांची देणगी दिल्याचे येथील ख्यातनाम सराफ सुरेश बिटला यांनी सांगितले.

या देणगीच्या माध्यमातून हैदराबाद रस्त्यावरील विडी घरकुल प्रशालेत शैक्षणिक सुविधा देण्यात येणार आहेत. रविवारी (दि. 17) या शाळेचे नामकरण ‘जनाबाई जनार्दन बिटला प्रशाला’ असे होईल. सकाळी साडेनऊला होणार्‍या या समारंभासाठी राज्याचे धर्मादाय आयुक्त विश्वासराव जाधव, लातूर विभागाचे सहआयुक्त दिलीप खोत, सोलापूरचे साहाय्यक धर्मादाय आयुक्त अमोल शिंदे येणार आहेत. या मान्यवरांच्या हस्ते संस्थेला देणग्या देणार्‍यांचा सत्कार होणार असल्याची माहिती सचिव दशरथ गोप यांनी दिली.

आईबाबतच्या भावना व्यक्त करताना श्री. बिटला म्हणाले, ‘वरंगल जिल्ह्यातील छोट्याशा खेड्यात आई जनाबाईचा जन्म झाला. लग्न म्हणजे काय हेही माहीत नसलेल्या वयात तिचे लग्न झाले. वडील जनार्दन बिटला यांचे प्राथमिक शिक्षण झाले. परंतु त्यांची गणिते पक्की होती. या कौशल्यावरच त्यांनी सोलापुरात बुधवार बाजारात सराफपेढी सुरू केली. ते कामात व्यस्त असताना आईने पाचही मुलींसह माझ्या शिक्षणाकडे कटाक्षाने लक्ष दिले. माझ्या सार्‍या बहिणी दहावी-बारावी शिकल्या. एकीने मुख्याध्यापिका पद मिळवले. मी वडिलांची पेढी आणखी मोठी केली. आईचे संस्कार आणि शिक्षणामुळेच हे घडू शकले. समाजाच्या तळागाळात अजूनही मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. त्यांना चांगले शिक्षण मिळावे, या दृष्टीने देणगीचा विनियोग व्हावा.’

चूल अन् मूल नको
"दहावी-बारावी शिकलेल्या मुली चूल आणि मूलच सांभाळतात. उच्च् शिक्षणाकडे कल असतो; परंतु परिस्थिती नसते. अशा मुलींचा शाळेतला पाया भक्कम केला तर गुणवत्तेच्या जोरावर त्या पुढे जाऊ शकतील. त्यासाठी दर्जेदार शिक्षण आवश्यक आहे.’’
-सुरेश बिटला, सराफ