आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्क्रॅप रिक्षांवर कारवाईचे आरटीओ विभागाला आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शहर वाहतूक पोलिस यांच्या पुढाकाराने शेअर रिक्षांना शहरात आठ ठिकाणी थांबे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी घेण्यात आला. रिक्षांसाठी दरपत्रक निश्चित करण्यात येणार आहे. रिक्षा चालक अनेकदा अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लुबाडणूक करतात, त्याला यामुळे आळा बसणार आहे. बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. याआधीही अशा प्रकारचे निर्णय झाले. परंतु, त्या निर्णयांची अंमलबजावणीच झाली नाही, त्यामुळे या निर्णयाचे काय होणार हा प्रश्न आणखी काही दिवस असाच राहणार आहे.
स्क्रॅप रिक्षांवर कारवाई अटळ
सध्या शहरात अनेक स्क्रॅप रिक्षा बिनबोभाटपणे रस्त्यावर धावत आहेत. किरकोळ स्वरुपात दंड भरून या रिक्षा पुन्हा रस्त्यावर धावत असल्याने याचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या निर्णयावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला. स्क्रॅप रिक्षा पुन्हा वापरात येऊ नये यासाठी आरटीओ विभागाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार लवकरच कारवाई सुरूहोईल.
येथे असतील थांबे - गेंट्याल टॉकीज ते विडी घरकूल, गेंट्याल टॉकीज ते पाण्याची टाकी, एसटी स्टँड ते सैफुल, एसटी स्टँड ते साखर कारखाना, एसटी स्टँड ते देगाव, एसटी स्टँड ते सोलापूर विद्यापीठ, एसटी स्टँड ते हिप्परगा गणपती. हे थांबे निवडण्याचे काम मोटार वाहन निरीक्षक आणि वाहतूक पोलिस करणार असून याचा अहवाल दोन-तीन दिवसांत आरटीओकडे जमा करण्यात येईल. दरपत्रकही ठरवण्यात येईल.
विद्यार्थी वाहतुकीसाठी ओम्नीला परवानगी - ओम्नीला विद्यार्थी वाहतुकीसाठी परवानगी देण्याचा निर्णयही बुधवारच्या बैठकीत झाला. ओम्नी वाहनातून होणारी विद्यार्थी वाहतूक ही अवैध असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’मध्ये प्रकाशित झाले होते. त्याची दखल घेऊन आरटीओने हा निर्णय घेतला. शहरात किमान 500 ते 600 ओम्नी चालक आहेत. आरटीओच्या कारवाईमुळे अनेक चालकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळणार होती. मात्र, आता या वाहनांना अधिकृत परवाने मिळणार आहेत. यासाठी मूळ आसनक्षमतेच्या दीडपट विद्यार्थी वाहतूक करण्याची मूभा देण्यात आली. या ठरावाला जिल्हाधिकारी गोकुळ मवारेंनी हिरवा कंदील दिला. येत्या दोन-तीन दिवसांतच परवाने नोंदणी व वाटपाचे काम सुरू होणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिलकुमार वळीव यांनी सांगितले.