आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे सॉफ्टवेअरने कर्मचार्‍यांची तारांबळ, तोबा गर्दीने कोलमडला सेतू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सेतू कार्यालयात दाखले घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे. दुसरीकडे संगणक प्रणाली मंद झाल्याने कामाची गती मंदावली. रांगेत तिष्ठत राहावे लागल्याने लोकांनी संताप व्यक्त केला. सगळे सेतू कार्यालय संगणक प्रणालीने जोडण्यात आले आहेत.

दहावी व बारावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी विविध दाखल्यांची गरज असते. त्यामुळे गर्दी होत आहे. येत्या दोन दिवसांत व्यवस्था पूर्ववत होण्याचा विश्वास सेतूचालकांनी व्यक्त केला. तर अन्न धान्य वितरण विभागाच्या चार परिमंडळ कार्यालयांमध्ये मंगळवारपासून ऑनलाइन अर्ज घेण्यात येणार आहेत.

सॉफ्टवेअर, फॉण्ट प्रॉब्लेम
सेतू सुविधा केंद्र सोमवारी ऑनलाइन सेवेने जोडण्यात आले. दोन महिन्यांपासून त्याचे काम सुरू होते. नव्या यंत्रणेचे प्रशिक्षण नसल्याने कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली. सॉफ्टवेअर नवे, फॉण्ट वेगळे असल्याने कर्मचार्‍यांना समजून घेऊन काम करण्यात वेळ लागत होता. अर्ज भरण्याच्या कामासाठी पाच ते सात मिनिटांच्या कामासाठी 15 ते 20 मिनिटे लागत होती. दाखला घेण्यासाठी दिलेली मुदत संपून चार ते आठ दिवस झाले तरी मिळत नसल्याने नागरिक संतापले.

अशी आहे ऑनलाइन सुविधा
एकाच खिडकीतून सर्व दाखले काढता येतात. कर्मचार्‍यास नाव, पत्ता, पूर्ण माहिती व दाखल्याचा प्रकार सांगा. ते ऑनलाइन अर्ज दाखल करतील. कागदपत्रांची पडताळणी करून प्रतिज्ञापत्र तयार करतील. ठरावीक मुदतीत साक्षीदाराच्या समवेत किंवा स्वत: दाखला घ्यावा. मूळ कागदपत्रे संबंधित तहसीलदार किंवा नायब तहसीलदार तपासतील. चलन भरल्यानंतर दाखला मिळेल. अर्ज केल्यानंतर मोबाइलवर एसएमएस येतो. माहिती तसेच दाखला तयार झाल्याचीही माहिती एसएमएसद्वारे मिळेल.

परिमंडळ कार्यालयात अर्ज भरा
दिवसभरात 750 अर्ज दाखल झालेत. नवीन यंत्रणेमुळे मध्यस्थ (एजंट) पूर्णत: आळा बसणार आहे. 31 जुलैपर्यंत शहरातील अन्नधान्य पुरवठा विभागातील चार परिमंडल कार्यालयात जादा संगणक ठेवून अर्ज दाखल करून घेण्यात येतील. परिमंडल ‘अ’ कस्तुरबा मार्केट, ‘ब’ कन्ना चौक, ‘क’ उत्तर तहसील कार्यालय पाठीमागे, ‘ड’ नेहरू हॉस्टेलजवळ सोय आहे.’’
पराग सोमण, निवासी उपजिल्हाधिकारी

दोन दिवसांत सुरळीत होईल
औरंगाबादच्या जेएमके इन्फोटेकने सॉफ्टवेअर तयार केलेले आहे. फॉण्ट, यंत्रणा नवीन असल्याने समजून घेण्यास उशीर होत आहे. यंत्रणा लोकांच्या फायद्याची आहे. रात्रंदिवस काम करून अर्ज निकाली काढू. दोन दिवसांमध्ये यंत्रणा सुरळीत होईल. ’’
रणजितसिंग ठाकूर, सेतू चालक

चार तासांची प्रतीक्षा
सकाळी साडेनऊ वाजल्यापासून रांगेत असून दुपारचे दीड वाजेपर्यंत माझा नंबरचा आला नाही. अतिश्य मंदगतीने काम सुरू आहे. महाविद्यालयातील प्रवेशासाठी दाखले लवकर मिळणे गरजेचे आहे. तीन दिवसांत न मिळाल्यास प्रवेश घेण्यात अडचण होईल.’’ स्नेहा गाजूल, विद्यार्थिनी

दिवस वाया गेला
माझ्या छोट्या बाळासह सकाळी दहा वाजता नॉनक्रिमिलेयर दाखल्यासाठी रांगेत उभी राहिले. दीड वाजता माझा नंबर आला. त्यावेळी दाखला या खिडकीतून मिळत नसून उत्तर सोलापूर तालुक्याच्या खिडकीत जाण्यास सांगितले. अख्खा दिवस वाया गेला असून प्रवेश प्रक्रिया चार दिवसांवर आली आहे.’’ सोनाली बारगजे, महिला

घर, नेटकॅफेतूनही अर्ज : घरातून किंवा नेटकॅफेतूनही दाखल्यांसाठी अर्ज करता येणार आहे. संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर ठरावीक क्रमांक मिळेल. त्यानंतर अर्ज करून कागदपत्रे स्कॅन करून जोडायची आहेत.

‘एसएफआय’चे मदत केंद्र : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने सेतू परिसरात मदत केंद्र सुरू केले आहे. आठ स्वयंसेवक अर्ज भरून देणे, त्याबाबतची प्रक्रिया समजावून सांगत होते. त्यांच्या केंद्राला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.