आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणुकांनी शहर शिवभक्तीत रंगले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, श्रीमानयोगी राजा श्री शिवछत्रपतींच्या जयंती उत्सवात बुधवारी अवघे शहर शिवमय झाले. दुपारी 4 वाजता निघालेल्या मिरवणुकांनी शहरवासीयांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ऐटीत लेझीम खेळणारे पथक, पुण्याहून आलेला शंभो, मोक्ष आणि नादब्रह्म ग्रुपचा नाशिक ढोल, सनई व ताशांच्या कर्णमधुर संगीताने शिवप्रेमींना एक वेगळाच आनंद मिळवून दिला.

प्रारंभी शिंदे चौक परिसरातील डाळिंबी आड येथे मध्यवर्ती महामंडळाच्या शिवमूर्तीची पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या हस्ते पूजा करून मिरवणुकीला सुरुवात झाली. या वेळी सुनील रसाळे, दास शेळके, लहू गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शिवप्रकाशचा ‘शंभो’
चार पुतळा चौकातील शिवप्रकाश मंडळाच्या वतीने यंदा प्रथमच पुण्याच्या शंभो ग्रुपला वादनासाठी आणले होते. 40 नाशिक ढोल, 15 ताशे, 1 पितळी प्लेट, सनईच्या माध्यमातून या संघाने ठेका धरायला लावणारा लय छेडून उपस्थितांना स्तब्ध केले. तसेच मोक्ष म्युझिक ग्रुपने शिवराय व महाराष्ट्र धर्माचा जयजयकार करणारी पाश्चात्य संगीताच्या साथीने सादर केलेल्या गीतांनी सर्वांचे लक्ष वेधले. हे कला प्रकार सादर होताना काही कलावंत दांडपट्टा, दंड, लाठी घेऊन शौर्यप्रात्यक्षिके सादर करत होते.

लेझीमचे विविध डाव
शिवप्रभू प्रतिष्ठान, मराठा वस्तीच्या धर्मवीर संभाजी तालीम, शिवराम प्रतिष्ठान, जेएमसी, शिवराष्ट्र आदी मंडळांचे लेझीम पथक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती.

शिवमुद्रा, कमळात शिवप्रतिमा
जुनी मिल चाळ येथील पापय्या तालीमच्या मंडळाने शिवमूर्तीच्या पाठीमागे सोनेरी चमकीची सुबक अशी 10 फुटी शिवमुद्रा लावली होती. तर पुणे नाका येथील शिवप्रभू प्रतिष्ठानने शिवरायांना कमलदलात विराजमान करून विद्युत रोषणाई केली होती.

..आणि अनर्थ टळला
चार पुतळा चौकातील शिवप्रकाश प्रतिष्ठानने उभारलेले भव्य व्यासपीठ सायंकाळी पावणेसात वाजता अचानक तुटले. प्रमाणापेक्षा जास्त जणांची गर्दी झाल्याने हा प्रकार झाला. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. केवळ एक कोपरा मोडल्याने त्याबाजूला ठेवलेले सोफासेट व खुच्र्या पडल्या.

महिलांचाही मोठा सहभाग
यंदाच्या मिरवणुकांत शिवप्रेमी मंडळांची संख्या वाढलेली होती. पण महिला आणि तरुणींचाही सहभाग मोठा होता. जुनी विष्णू चाळीतील तब्बल 100 महिला भगवा फेटा, नऊवारी साड्या परिधान करून सहभागी झाल्या होत्या, तर महाविद्यालयीन तरुणीही चौकाचौकांत थांबून मिरवणुका पाहत होत्या.

महापालिकेच्या वतीने अभिवादन
शिवजयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने शिवाजी चौकातील महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. महापौर अलका राठोड, नगरसेविका सुशीला आबुटे, आनंद चंदनशिवे, उपमहापौर हारून सय्यद, विजय पुकाळे, विरोधी पक्षनेता कृष्णहरी दुस्सा, स्थायी समिती सभापती इब्राहिम कुरेशी, सुमन जाधव आदी उपस्थित होते.

पाच मंडळांवर खटला भरणार
शिवजयंती मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच मंडळांवर उद्या गुरुवारी खटले दाखल केले जाणार आहेत, अशी माहती विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत काकडे यांनी दिली. ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक यंत्रच्या साहाय्याने विशेष शाखेच्या पोलिस पथकाने पाहणी केली. मिरवणुकीमधील साऊंड सिस्टीम तपासण्याकरता आठ यंत्र वापरण्यात आले. विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत काकडे, पर्यावरण अधीक्षक विडे, पोलिस उपनिरीक्षक मकरंद जोशी यांच्यासह तीन कर्मचारी आणि एक होमगार्ड असा पथक होते. मिरवणुकीमध्ये साधारण 65 ते 70 डेसीबल ध्वनी पाहिजे. पाच मंडळांची साऊंड सिस्टीम तपासण्यात आली आणि त्यांनी 100 ते 105 डेसीबल ध्वनी ठेवल्याचे यंत्राद्वारे आढळून आल्याचे चंद्रकांत काकडे यांनी सांगितले.

अश्वारूढ शिवरायांचे आकर्षण
जुनी विष्णू मिल चाळीतील जय महाराष्ट्र तरुण मंडळाने तब्बल 27 फूट उंच शिवरायांचा अश्वारूढ हलता पुतळा मिरवणुकीत आणला होता. घोड्यांच्या उठणार्‍या टापा व शिवरायांची तळपती तलवार पाहण्यासाठी चौकाचौकात प्रचंड गर्दी होत होती. अनेकजण प्रथमच आलेला हा भव्य देखावा पाहात होते. आपल्या मोबाइलमध्ये हा क्षण टिपण्यासाठी अनेकजण सरसावत होते.

डीजे, डॉल्बीचा थरथराट
शिवराम, शिवराष्ट्र, शिवस्पर्श, हिंदूश्री, श्रीमंतराजे प्रतिष्ठानने डीजे डॉल्बी लावल्या होत्या. शिवप्रेमी बेफान होऊन त्यासमोर नाचत होते. काही मंडळांनी ध्वनी र्मयादेचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.