आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Solapur SMC Commissioner Gudewar Special Interview

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयुक्त म्हणाले, शहरात 47% बांधकामे अनधिकृत; धनदांडग्यांना 10 दिवसांत नोटिसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील अतिक्रमण आणि बेकायदा इमारती पाडताना पालिकेचे उत्पन्न वाढवल्याने महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कार्याचा ठसा उमटत आहे. नगर अभियंता सुभाष सावस्कर यांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित झाल्याने त्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया श्री. गुडेवार यांनी सुरू केली. परंतु या प्रकरणावरून जातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सावस्कर हे मागासवर्गीय असल्याने त्यांना टार्गेट करू नका, अशी भूमिका आमदार माने यांनी घेतली. महापौर राठोड यांनीही कारवाईच्या विरोधात सूर लावला. असे असले तरी आपल्या कार्यपद्धतीत खंड न पाडता आयुक्तांनी पुढील प्रक्रिया सुरूच ठेवली आहे. अतिक्रमण काढण्याला सर्वसामान्य सोलापूरकरांचा मनापासून पाठिंबा असला तरी धनदांडग्यांना यातून सूट तर मिळणार नाही ना, अशी शंकाही व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त श्री. गुडेवार यांची ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी खास मुलाखत.


तुम्ही सोलापूर शहरात येताना काय व्हिजन घेऊन आलात?
> माझी काम करण्याची एक पद्धत आहे, त्यानुसार मी काम करतो. कोणी काही सांगितले म्हणून माझ्या कार्यपद्धतीत फरक पडत नाही. सोलापुरात येताना विशेष काही व्हिजन ठरवून आलेलो नाही, शासनाने मला ज्या कामासाठी पाठवले त्यानुसार काम करणे, हेच माझे व्हिजन आहे.
हॉकर्स झोनची सुविधा देता येईल काय?
> शहरातील फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन लवकरच करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या चॅलेंजिंग फंडातून शॉपिंग शेड बांधता येईल. त्यासाठी केंद्राकडे अडीच कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. ओडिशातील भुवनेश्वर शहराच्या धर्तीवर मॉडेल प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

सर्वसामान्यांवर कारवाई करता असे बोलले जाते?
> मला कोणाची इमारत पाडण्याची हौस नाही. नगर अभियंता सावस्कर यांना नोटीस दिली, ते सर्वसामान्य आहेत का? शहरात विनापरवाना मंगल कार्यालये बांधण्यात आली आहेत, त्यांची माहिती मी काढतोय? ते सर्वसामान्य आहेत का? मी बेकायदा कामे करतो, असे कोणीही सांगावे. सर्वसामान्यांच्या मनात जे आहे तेच काम मी केले. मी सर्वसामान्यांतून आलो, याची मला जाण आहे.
आमदार दिलीप माने यांच्याच मतदार संघात कारवाई का?
> आमदार दिलीप माने यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री आले होते, त्यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी सांगितले होते की, होटगी आणि विजापूर रोड मला मोकळे करून द्या, त्यामुळे मी कारवाई केली. अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी मला फोनही केला होता. त्यामुळेच मी प्रोत्साहित झालो.
शहरात बुलडोझर कधी फिरणार?
> शहरातील अतिक्रमण काढणार आहे. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून अतिक्रमणे करण्यात आली आहेत. संपूर्ण शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी अडीच ते तीन वर्षे लागतील. शहरातील जवळपास 47 टक्के बांधकामे अनधिकृत आहेत. त्यामुळे असे शहर मी आतापर्यंत पाहिले नाही. योग्य त्या ठिकाणी बुलडोझर सक्षमपणे फिरेल, एवढे मात्र मी खात्रीने सांगू शकतो.

मुख्य रस्त्यांवरील बांधकामांना पार्किंग नाही, त्याबाबत तुमची भूमिका काय?
> मोठय़ा इमारतींच्या बांधकामाच्या पार्किंगची माहिती एकत्रित करण्याचे काम सध्या सुरू आहे. संबंधितांना दहा दिवसांत महापालिकेकडून नोटिसा पाठवण्यात येणार आहे. याला काही राजकीय नेते जबाबदार आहेत.
काही अधिकार्‍यांचे आर्थिक हितसंबंध गुंतल्याची चर्चा होत असते, त्याबद्दल?
> कोणीही बेकायदा आर्थिक व्यवहार करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गोपनीय तक्रार करावी. त्याबाबत त्यांना सहकार्य करण्यास मी तयार आहे.
अतिक्रमणविरोधी प्लॅन तयार आहे का?
> शहरातील अतिक्रमण काढण्याचा कोणताही प्लॅन केला नाही. पण ज्या ठिकाणी आवश्यक वाटेल त्या ठिकाणी ती मोहीम सक्षमपणे राबवण्यात येणार आहे.
पालिकेच्या जागांवरील मोहीम कधी?
> महापालिकेच्या जागांवरील अतिक्रमणे प्राधान्याने हटवण्यात येतील.
अन्य काही सांगायचे आहे?
> नागरिकांनी सहकार्य करावे, त्यांनी कर रूपाने भरलेल्या प्रत्येक पैशाचा मी हिशेब देणार आहे. रस्ते, दिवाबत्ती, पाणी आणि कचरा व्यवस्थापन ही कामे केल्यास कोणी महापालिकेकडे तक्रार घेऊन येणार नाही. हीच कामे करण्याचा माझा प्रयत्न आहे.