आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांच्या समर्थनार्थ सोलापूरकर रस्त्यावर, काँग्रेस पदाधिकार्‍यांची मुजोरी अजूनही कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सत्ताधारी कॉँग्रेस नगरसेवकांच्या दबावतंत्रामुळे पदभार सोडणारे महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या समर्थनार्थ मंगळवारी विविध राजकीय पक्ष, संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. बहुजन समाज पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनपावर दोन स्वतंत्र मोर्चे काढून सत्ताधार्‍यांना जाब विचारला, तर बुधवारी सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारानंतरही कॉँग्रेसची मुजोरी कायमच असल्याचे दिसून आले. ‘हा विरोधकांचा राजकीय स्टंट आहे,’ असा आरोप सभागृह नेते महेश कोठे यांनी केला आहे.
कॉँग्रेस पदाधिकार्‍यांच्या बेकायदा इमारतींवर कारवाई केल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कॉँग्रेस नगरसेवकांनी आयुक्त गुडेवार यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यांच्याविरोधात षडयंत्र रचून कामातही वेळोवेळी अडचणी आणण्याचे प्रकार होत होते. सोमवारीही पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाचे निमित्त करून कॉँग्रेस नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या गुडेवार यांनी तातडीने शासनाकडे बदलीसाठी अर्ज पाठवून देत आयुक्तपदाचा कार्यभार सोडला होता. दरम्यान, त्यांच्या समर्थनार्थ महापालिका कर्मचार्‍यांनी सोमवारपासून आंदोलन सुरू केले असून या कर्मचार्‍यांनी राजीनाम्याची तयारीही दर्शविली आहे. दरम्यान, या प्रकरणी राज्य सरकार घेईल तो निर्णय आपल्याला मान्य असेल, अशी भूमिका गुडेवार यांनी घेतली आहे.
हा तर विरोधकांचा राजकीय स्टंट : कोठे
महापालिका आयुक्तांना समर्थन देण्यासाठी सर्वपक्षीयांच्या वतीने बुधवारी शहराच्या विविध भागांतून पाच वेगवेगळे मोर्चे काढण्यात येणार आहे. तर ‘विरोधी पक्षाने शहर बंदची हाक दिली असली तरी हा त्यांचा राजकीय स्टंट आहे,’ अशी टीका कॉँग्रेसचे सभागृह नेते महेश कोठे आणि अ‍ॅड. यू. एन. बेरिया यांनी केली आहे.