आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur SMC Commissioner Gudewar Will Be Joins Once Again Tomarrow

सोलापूर पालिका आयुक्त गुडेवारांचा राजीनामा मागे, उद्या रूजू होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सत्ताधारी कॉँग्रेस नगरसेवकांच्या दबावतंत्रामुळे पदभार सोडणारे सोलापूर महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी आपली तलवार म्यान करीत राजीनामा मागे घेतला आहे. तसेच ते उद्या चार वाजता पुन्हा पदभार संभाळायाला सुरुवात करणार आहेत. राज्याच्या प्रधान सचिवांच्या भेटीनंतर व सोलापूरकर वासियांच्या भावना लक्षात घेऊन राजीनामा मागे घेत असल्याचे गुडेवार यांनी सांगितले. भावनेच्या भरात आपण हा निर्णय घेतला होता मात्र, सोलापूरकरवासियांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आपण भारावून गेलो आहे. आता शहरातील नागिरकांसाठी नव्या उमेदीने काम करू असे गुडेवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कॉँग्रेस पदाधिकार्‍यांच्या बेकायदा इमारतींवर कारवाई केल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कॉँग्रेस नगरसेवकांनी आयुक्त गुडेवार यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यांच्याविरोधात षडयंत्र रचून कामातही वेळोवेळी अडचणी आणण्याचे प्रकार होत होते. सोमवारीही पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाचे निमित्त करून कॉँग्रेस नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या गुडेवार यांनी तातडीने शासनाकडे बदलीसाठी अर्ज पाठवून देत आयुक्तपदाचा कार्यभार सोडला होता. दरम्यान, त्यांच्या समर्थनार्थ महापालिका कर्मचार्‍यांनी सोमवारपासून आंदोलन सुरू केले होते तसेच अनेक कर्मचार्‍यांनी राजीनाम्याची तयारीही दर्शविली होती. गुडेवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी मंगळवारी सोलापूरातील विविध राजकीय पक्ष, संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. तर, बहुजन समाज पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनपावर दोन स्वतंत्र मोर्चे काढून सत्ताधार्‍यांना जाब विचारला, तर बुधवारी (आज) सोलापूर बंदची हाक देण्यात आली होती. अखेर आज सकाळी गुडेवार यांनी राज्य सरकारशी चर्चा केली व राजीनाम्याचा विषय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या प्रकारानंतरही कॉँग्रेसची मुजोरी कायमच असल्याचे दिसून येत आहे. तसेच गुडेवार प्रकरणी ताठर भूमिका कायम ठेवली आहे. काँग्रेस नेत्या व आमदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस नगरसेवकांचीच बाजू घेतल्याचे दिसून आले आहे.