आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur SMC New Commissioner Chandrakant Gudewar

एक वेळ संधी; दुसर्‍यांदा करणार थेट कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘प्रत्येकांना एकवेळ संधी देतो. दुसर्‍यांदा कडक कारवाई करतो. नोकरीच्या आयुष्यातील रस्त्यावरचा स्पीडब्रेकर कर्मचार्‍यांना दाखवून दिला आहे. त्यामुळे त्यांनी ठरवावे की, तेथे सावध व्हायचे की; तसेच जाऊन अपघाताला आमंत्रण द्यायचे.’ हे शब्द आहेत महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांचे! त्यांनी शनिवारी महापालिका कार्यालयांची पाहणी केली. लोकाभिमुख होण्याचा सल्ला देत त्यांनी कर्मचार्‍यांना असा सज्जड दम दिला.

दोन तासांच्या भेटीत श्री. गुडेवार यांनी कर्मचार्‍यांना आपलेसे व मोकळे वाटेल अशा पद्धतीने संवाद साधला. त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. आतापर्यंत सात अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केल्याचा दाखला देत प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. योजनेची आणि कामाची माहिती नागरिकांना दिली तर ते समाधानी होतील, असेही त्यांनी सांगितले. कर आकारणी, मुख्य लेखापरीक्षक, नगर रचनासह सर्व कार्यालयांना त्यांनी भेट दिली.

भंडेसह त्या कर्मचार्‍यांच्या मालमत्तेचा शोधा घ्या
महापालिकेतील गाळेभाडे वसुलीत झालेल्या भंडे घोटाळ्याची त्यांनी गंभीर दखल घेतली. सामान्य प्रशासन विभागात त्याची माहिती घेतली. घोटाळ्याचा गुन्हा दाखल झाला. पुढे काय झाले, त्याबाबत पोलिस खात्यातील तपास अधिकार्‍यांना पत्र लिहून विचारा. लिपिक जटिंगराया भंडेसह त्या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि कर्मचार्‍यांची मालमत्ता कोठे आहे याचा शोध घ्या.

आतापर्यंत साडेतीनशेपेक्षा जास्त जणांवर फौजदारी केली
पाच-सहा सामान्य लोकांना मी आर्थिक मदत केली. त्यांनी ते पैसे नंतर परत केले. त्यामुळे लोकांवर माझा जास्त विश्वास आहे. नागरिकांना माहिती दिली तर ते कधीही तक्रार करत नाहीत. फलक लावून कामाची माहिती द्या. लोकांना अधिकार्‍यांचा मोबाइल नंबर दिला पाहिजे. सहसा कर्मचारी चुका करत नाहीत. त्यामुळे त्यांना एकवेळ संधी देतो. दुसर्‍यांदा नाही. आतापर्यंत 350 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.’’ चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका

त्रुटी कळवणे आपले काम
बांधकाम परवाना विभाग : परवान्यासाठी आलेले 2 मे रोजीचे अर्ज श्री. गुडेवार यांनी स्वत:च काढले. आलेले नऊ अर्ज पाहात त्यातील दोघांना परवानगी दिली. अन्य सात जणांना का दिली नाही? असे विचारले. त्यांच्या अर्जात त्रुटी असतील तर त्यांना कळवणे आपले काम आहे. का कळवले नाही? असा प्रश्न विभाग प्रमुख दीपक भादुले यांना केला. ते चांगलेच गांगरले. परवाना रखडलेल्या अर्जांची यादी व कारणे सादर करण्याचे आदेश दिले. बांधकाम परवाना देताना रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्तीचे पैसे नागरिक भरतात. त्यांना या सुविधा दिल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

महापालिकेबद्दल वाईट ऐकायला मिळाले
रेल्वेने पुण्याला प्रवास करताना आलेला अनुभव श्री. गुडेवार यांनी सांगितला. डब्यातील प्रवाशी महापालिकेबद्दल दीर्घकाळ वाईट बोलत होते. बांधकाम परवानाविषयी अस्वस्थता खूप आहे. मी त्यांचे ऐकून घेत होतो. त्यामुळे मी रेल्वेत जेवलो नाही, असे नगर अभियंता कार्यालयात आयुक्तांनी सांगितले.

गाळ्यात पोटभाडेकरू कसे
भूमी व मालमत्ता : महापालिकेच्या जागेत भाडेकरू महापालिकेचाच असला पाहिजे. तेथे पोटभाडेकरू कसे? त्या भाडेकरूंवर आमचे नियंत्रण नाही का? दुकानादारांकडे जाऊन चौकशी केली पाहिजे, असे भूमी व मालमत्ता अधीक्षक सी. के. पाणीभाते यांना सांगितले.

सांगा, ‘जेई’ कुठे जाऊन आले
पाणीपुरवठा विभाग : नगरोत्थान योजना कार्यालयातील उपअभियंता लक्ष्मण चलवादी यांना थेट सवाल करत आयुक्तांनी विचारले ‘सांगा तुमचे पाच ‘जेई’ (कनिष्ठ अभियंता) कुठल्या कामावर जाऊन आले.’ ‘जेईं’च्या कामाची माहिती श्री. चलवादी यांनी दिली.

आरोग्य निरीक्षकांचा धाक नाही
ड्रेनेज सफाई विभाग : ड्रेनेज लाइनमध्ये कचरा आदी गोष्टी टाकल्याने त्या भरतात. संबंधितांना आरोग्य निरीक्षक नोटीस देतात. पुढे काही होत नाही. असे असेल तर याचा अर्थ आरोग्य निरीक्षकांचा धाक नाही. मग निरीक्षकांनांच नोटीस दिली पाहिजे.

जा, जन्म रजिस्टर घेऊन या
जन्म-मृत्यू नोंदणी विभाग : लिपिक अलकुंटे यांना ‘जा, जन्म रजिस्टर घेऊन या’ असा थेट आदेश दिला. लिपिक चांगलेच चपापले. त्यांना त्यांचे रजिस्टर शोधण्यासाठी तब्बल पंधरा मिनिटे लागली. तोपर्यंत आयुक्त तेथेच उभे होते. रजिस्टर आल्यानंतर त्याची तपासणी केली.

पहाटे साडेपाचला येईन
आरोग्य विभाग : सफाई कर्मचारी आणि आरोग्य निरीक्षकसह अन्य कर्मचारी पहाटे साडेपाचला येतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. मी कधीही पहाटे भेट देऊन पाहणी करेन.

मोठय़ा थकबाकीदारांवर कारवाई करा
एलबीटी : मोठय़ा थकबाकीदारांवर कारवाई करा. त्यामुळे इतर लोकांवर त्यांचा प्रभाव पडेल. एलबीटी कार्यालयात व्यापार्‍यांसाठी सोयी देण्याचे आदेश त्यांनी दिले.