आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवजड वाहतूक: सोलापूरात ‘यमदूतां’ची वाट यापुढेही मोकळीच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- गेल्या वर्षभरात शहरातील जवळपास 25 जणांचे बळी घेणार्‍या अवजड वाहतुकीचा प्रश्न अजूनही रखडलेलाच आहे. ही वाहतूक शहराबाहेरून काढावी, यासाठी ‘बायपास’चा पर्याय आहे. मात्र, शासनस्तरावर केवळ विजापूर-पुणे बायपासला मंजुरी मिळाली. पण, त्याचे कामही पूर्णत्वाला जाण्यासाठी आणखी चार-पाच वर्षे लागणार आहेत.

विजापूर-हैदराबाद बायपास महामार्ग प्रस्तावाच्या ‘फाईल’मध्येच अडकला आहे. अवजड वाहनांमुळे शहरात होणारी अपघातांची मालिका कायम असून, शुक्रवारी दुपारी एकाचा मृत्यू झाला.

अवजड वाहतूक शहराबाहेरून नेण्यासाठी बायपासचा पर्याय समोर आला. त्यातील पुणे-विजापूर हा बायपास रस्ता मंजूर झाला आहे. त्याचे काम भूसंपादनाच्या प्राथमिक स्थितीत आहे. या बायपासचे काम 2016 मध्ये पूर्ण होईल, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्गाचे तांत्रिक विभागाचे व्यवस्थापक उमेश झगडे यांनी दिली.

गुरुनानक चौक ते जुना बोरामणी नाका या रस्त्यावरून जड वाहतूक मोठय़ा प्रमाणात होते. याच रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात अपघात झाले. त्यामुळे येथून दिवसभरासाठी जड वाहतूक बंद करावी, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती. त्यानंतर ती पूर्णपणे बंद करण्यात आली. प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी बायपास तयार करण्याचा निर्णय पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या बैठकीत घेण्यात आला. पुणे - विजापूर या बायपासला मंजुरी मिळाली, भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले आहे. जंगली हॉटेलपासून केगाव हत्तूरपर्यंत 21 मीटरचा बायपास होणार आहे. भूसंपादनाची प्रक्रिया संपल्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू होईल. त्यानंतर 30 महिन्यांत ते पूर्ण होईल. हे काम 2016 मध्ये पूर्ण होणार आहे.

नागरिकांचे म्हणतात..
अपघातांचे प्रमाण पाहता शहरात जड वाहनांना प्रवेशास दिवसभर मनाई केली पाहिजे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण बळी पडत आहेत.

व्यापारी म्हणतात..
माल घेऊन येणार्‍या वाहनांना शहरात दिवसा प्रवेश मिळाला पाहिजे. रात्री माल उतरवण्यासाठी हमाल मिळत नाहीत. त्यामुळे अडचण व नुकसान होत आहे.

मार्केड यार्ड परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी होते. पुणे, हैदराबाद, विजापूर मार्गावर वाहनांची संख्या मोठी असते. या मार्गांवर जाण्यासाठी मार्केट यार्ड चौकात यावेच लागते. वेळेत आपला मार्ग पूर्ण करण्यासाठी वाहनचालकांमध्ये स्पर्धाच असते. या दोन तासांत मार्केट यार्ड चौकात चक्का जाम असतो. पुणे, हैदराबाद रस्त्यांवर वाहनांची दोन, तीन किलोमीटरची रांग लागलेली असते.

अवजड वाहनांवर हवे नियंत्रण
वाढते अपघात लक्षात घेत जडवाहनांना दिवसा शहरात प्रवेश बंद केलेला होता. नोव्हेंबरमधील हा निर्णय बदलत डिसेंबरमध्ये दुपारी दीड ते साडेतीनपर्यंत प्रवेशास मुभा देण्यात आली होती. त्यावर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. हा निर्णय 30 जानेवारीपर्यंत लागू होता. पुढील निर्णयासाठी नागरिकांकडून सूचना मागवलेल्या होत्या.दुपारी जड वाहने एकदम शहरात येतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. मोठय़ा चौकात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस थांबतात. त्यांचा फारसा उपयोग होत नाही. बंदीच्या वेळेतही जडवाहने ये-जा करतात. यावर नियंत्रण हवे. अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई होते. पण, ते वाहन पुढे सोडूच नये यासाठी उपाययोजना होणे गरजेचे आहे. सिग्नल यंत्रणा अथवा (इशारा करून) वाहतूक नियोजन करता येते का, याची चाचपणी व्हावी. बंदीच्या कालावधीत अवजड वाहनांना फिरू देऊ नये याबाबत कडक अंमलबजावणी व्हावी.

जडवाहनांना प्रवेशास मुभा कायम
शहरात जडवाहनांना प्रवेशास दुपारी दीड ते साडेतीनपर्यंत असलेली मुभा कायम ठेवण्यात आली आहे. या संदर्भात लोकांची मते मागवलेली होती. त्यांचा विचार झाला.’’ खुशालचंद बाहेती, सहायक पोलिस आयुक्त