आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिग्नलचे दिवे बंद ठेवून अवजड वाहनांवर कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - दीड महिन्यापूर्वी शहरात दोन चौकांत सिग्नल दिवे सुरू होते. सिग्नल सुरू नसल्यामुळे वाहतूक पोलिस बेशिस्तपणा आल्याचे सांगत होते. आता महापालिकेने दहा चौकांत दिवे सुरू करून दिले. पोलिस आपल्या र्मजीनुसार दिवे चालू, बंद करतात. सोमवारी सकाळी तर कहरच झाला. आसरा चौकातील दिवे बंदच होते. त्या ठिकाणी नेमलेले पोलिस कर्मचारी गुरे वाहून नेणारा ट्रक अडवून दंडात्मक कारवाई करण्यात गुंतले होते. महावीर चौकात दोन साहाय्यक निरीक्षक, सहा पोलिसांनी अवजड वाहनांवर कारवाई केली. अवजड वाहनांवर कारवाई मोहीम हाती घेण्यात आल्यामुळे सोमवारी सिग्नल बंद असल्याचे सांगण्यात आले. गांधीनगर चौक, डफरीन चौक, रंगभवन चौकांत सिग्नल सुरू होते. शांती चौक,संत तुकाराम चौक, आम्रपाली चौक, सिव्हिल चौकातील दिवे कधी बंद, कधी चालू असतात.

विशेष मोहीम होती
महावीर चौकात सोमवारी सकाळी अवजड वाहनांवर कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे महावीर चौकातील सिग्नल दिवे बंद होते. 50 ते 55 अवजड वाहने, वाळूच्या ट्रकवर कारवाई केल्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक दिगंबर शिंदे यांनी सांगितले.

तीन चौकांतील सिग्नल बंदच
शहरातील पत्रकारभवन, जुना एम्प्लॉयमेंट चौक, जुना बोरामणी नाका या तीन चौकांतील सिग्नल अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत. आणखी चौदा ठिकाणी नव्याने सिग्नल बसविण्यासाठी वाहतूक शाखेने प्रस्ताव दिला आहे. त्याबाबतही काही कार्यवाही झालेली नाही. सिग्नल बंद असल्यामुळे या भागात वाहतुकीची कोंडी होत आहे. सिग्नल सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

नो पार्किंग झोनमध्ये उभारतात वाहने
कामत हॉटेल, आंबेडकर चौक, चार पुतळा परिसर, सरस्वती चौक, सातरस्ता, आसरा, रंगभवन या चौकांत नो पार्किंग झोन (पन्नास मीटरचा परिसर) आहे. तरीही या सर्व ठिकाणी वाहने उभी केली जातात. अशा वाहनांवर कारवाई केली जात नाही. सिग्नल चौकांतच रिक्षा, अँपेरिक्षा उभ्या केल्या जातात. झेब्रा क्रॉसच्या पुढे येऊन वाहने थांबतात. एक दिवस कारवाईचे नाटक झाले की पुढे ही मोहीम थंडावली. कामत हॉटेल ते ध्रुव हॉटेल परिसर या दोन्ही मार्गांवर अनेक वाहने रस्त्याच्या कडेला थांबतात.

अवजड वाहने शहरात येतातच कशी?
सकाळी सात ते रात्री सात यावेळेत अवजड वाहनांना शहरात बंदी आहे. दुपारी दीड ते साडेतीन यावेळेत शिथिलता देण्यात आली आहे. असे असले तरी बंदीच्या काळात वाळू, खडी, सिमेंटच्या वाहनांची शहरातून ये-जा सुरू असते. अनेकदा चौकात पोलिस थांबलेले असतात. वाहने अडवून त्याचवेळी कारवाई का केली जात नाही, अशी मोहीम घेऊन आळा बसणार आहे का, बंदी असतानाही शहरात अवजड वाहने येतातच कशी, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

थांबलेल्या ट्रकवर दुचाकी आदळून महिला जखमी
सातरस्ता परिसरातील हॉटेल लोटससमोर थांबलेल्या ट्रकला मागून धडकल्याने सोमवारी सकाळी दुचाकीस्वार महिला जखमी झाली. पूजा किशोर पमनानी (वय 40, रा. गुरुनानक चौक) असे त्यांचे नाव आहे. पहाटे बिघाड झाल्यामुळे ट्रक थांबलेला होता. सातरस्त्याहून गुरुनानक चौकाकडे दुचाकीवरून पमनानी भावजयीसोबत जात होत्या. त्यांची दुचाकी पाठीमागून ट्रकवर आदळली. अपघातानंतर पोलिसांनी ट्रकला जागेवरून हलवण्यास चालकास सांगितले.