आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ परीक्षा: कुलगुरू, प्राचार्यांवर आली परीक्षेची घडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक सुमारे 45 दिवसांपासून संपावर असल्याने परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. त्याच्या नियोजनावर चर्चा करण्यासाठी कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी सोमवारी दुपारी तीनला प्राचार्यांची बैठक बोलावली आहे. परीक्षा घेण्याची अंतिम जबाबदारी राज्य सरकारने संबंधित कुलगुरूंवर टाकली आहे.

प्राध्यापकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर्स असोसिएशनने (एम. फुक्टो) परीक्षा कामावर बहिष्कार टाकला आहे. तो 4 फेब्रुवारीपासून सुरू आहे. राज्य सरकारने कडक भूमिका घेत परीक्षा कामात बाधा आणणाºया व्यक्ती वा संघटनेवर प्रसंगी फौजदारी करण्यासही सांगितले आहे.

परीक्षांसाठी सरकारच्या सूचना
परीक्षा सुरळीत होण्यासाठी सरकारने 20 मार्चला मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षा घेणे व उत्तरपत्रिका तपासणे या तीन टप्प्यांसाठी उपाययोजना सूचवल्या आहेत. मागील शैक्षणिक वर्षासाठी तयार असलेल्या तीन संचापैकी न वापरलेला प्रश्नसंच वापरावा. प्रश्नसंच उपलब्ध नसल्यास विनाअनुदानित महाविद्यालयातील कार्यरत प्राध्यापकांकडून तो तयार करण्यात यावा. या शिक्षकांच्या मदतीनेच परीक्षा घेण्यात यावी. तसेच शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी वर्ग, बेरोजगार पीएच.डी., सेट - नेट अर्हताधारक यांचीही मदत घेता येईल. या सर्वांची परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक किंवा समवेक्षक म्हणून नियुक्ती करावी. तपासण्यासाठी बहिष्कारात सहभागी नसणारे प्राध्यापक, हंगामी व कंत्राटी प्राध्यापक यांना काम देण्यात यावे. मनुष्यबळ कमी पडत असल्यास सेवानिवृत्त शिक्षकांची मदत घ्यावी, असे सुचवण्यात आले आहे.

विद्यापीठाने मागितली यादी
आंदोलनात सहभागी प्राध्यापक, तासिका तत्त्वावरील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाºयांची यादी महाविद्यालयांनी द्यावी, असे परीक्षा नियंत्रक डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी कळविले आहे. विद्यापीठ परीक्षेच्या कामकाजासाठी आवश्यक ते मनुष्यबळ, निधी, दळण -वळण आदी सुविधा परीक्षा नियंत्रकांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कुलसचिवांवर आहे.