आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरिअन विद्यापीठाशी सोलापूर विद्यापीठाचे शैक्षणिक सहकार्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जागतिक स्तरावर, विशेषकरून कोरियन विद्यापीठासोबत सौहार्दपूर्ण सहकार्याचे संबंध प्रस्थापित करण्याचे सोलापूर विद्यापीठाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी दिली. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे शैक्षणिक विषयावरील एक जागतिक कार्यशाळा नुकतीच झाली. आफ्रिकन, आशियायी आणि पाश्चमात्य देशांमधील विविध विद्यापीठे, तेथील शिक्षणमंत्री आणि विद्यार्थी यांचे यानिमित्ताने एकत्रिकरण झाले होते. यात विविध देशांतील शिक्षणपद्धतीवर मंथन होऊ शकले. या जागतिक शिबिरात सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्यासह सुमारे 40 देशांतील 50 कुलगुरू, 20 शिक्षणमंत्री व चार हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शिबिराचा वृत्तांत डॉ. मालदार यांनी दिला. सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता विभाग यादृष्टीने विकसित करण्याची संधी मिळू शकेल का याबद्दल विचार सुरू आहे. अर्थात हा विचार प्राथमिक अवस्थेत असून सविस्तर आणि सर्वांगीण विचारातूनच याला दिशा मिळू शकेल असे ते म्हणाले.

कार्यशाळेत काय झाले?
सेऊल येथे विविध देशांतून आलेल्या विद्यार्थ्यांच्या पथकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आदानप्रदान केले. या कार्यशाळेद्वारे युवा नेतृत्व निर्माण करणे, विद्यार्थ्यांचे मानवी मूल्य, तरुणांची भावी वाटचाल, तरुणांसमोरील प्रश्न समजावून घेऊन त्यांच्यामध्ये तांत्रिक व उच्च शिक्षणाची आवड व मजबूत निर्णयक्षमता निर्माण करणे यावर सखोल चर्चा झाली.

थक्क करणारे अत्याधुनिक संशोधन
कोरिअन विद्यापीठांनी तेथील संशोधन उद्योगाशी सहकार्य करार केले आहेत. त्यातूनच जगप्रसिद्ध असा डॉली क्लोनचा प्रयोग अस्तित्वात आला होता. या धर्तीवरचे अनेक प्रयोग तेथील विद्यापीठांतून अजूनही सुरू आहे. चार हजार आठशे वर्षं जगणारे ब्रिसटोकोन पाइन ट्री तेथे आढळून येतात. 112 मीटर उंची असते, दोन हजार टन पेक्षा जास्त वजन या वृक्षाचे भरते. या बहुपयोगी वृक्षाची मूलपेशी शोधून त्याचा संयोग जर मानवातील मूलपेशींबरोबर केला गेला तर काय होईल? असा विचार करून विविध प्रयोग तेथे सुरू आहेत. त्यातून कोणत्याही कृषी उत्पादनांचा वेग अर्मयाद प्रमाणात वाढविता येईल काय? यावर प्रयोग सुरू आहेत. वृक्षांची मूलपेशी आणि मानवी शरिरात आढळणारी मूलपेशी यांचे बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून काही औषधे, काही वनौषधी यांचे उत्पादन करण्याची अवाढव्य प्रयोगशाळा उभी राहिली आहे. असे थक्क करणारे संशोधन कोरिअन विद्यापीठ करत आहेत.