आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर विद्यापीठ: कुलसचिवांसह 13 जणांचे वेतन अमान्य; होणार कार्यवाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव कॅ. डॉ. नितीन सोनजे यांच्यासह 13 कर्मचार्‍यांच्या वेतनासंदर्भातील विविध त्रुटी समोर आल्या आहेत. सोलापुरातील विभागीय शिक्षण सहसंचालिका डॉ. अरुणा विंचूरकर यांनी केलेल्या तपासणीत ही बाब सामोर आली आहे.

25 नोव्हेंबर 2012 पर्यंत बीसीयूडी पदावर असलेल्या डॉ. राजेंद्र शेंडगे यांनी त्यांच्या कार्यकालात घेतलेला हजारो रुपयांचा भत्ताही वेतन लेखापरीक्षणात अमान्य झाला आहे.

डॉ. विंचूरकर, कोल्हापूर उच्च शिक्षण विभागातील निवृत्त प्रशासन अधिकारी अर्जुन पाटील, लेखाधिकारी कदम या त्रिसदस्यीय समितीने 8 ते 11 जानेवारी 2013 दरम्यान ही तपासणी केली होती. यामध्ये 2004 पासूनचे विद्यापीठातील सर्वच कर्मचार्‍यांची वेतनाचे परीक्षण झाले. डॉ. सोनजे यांच्यासह 13 कर्मचार्‍यांच्या बाबतीत वेतनत्रुटी असल्याचा प्राथमिक अहवाल दिला आहे. त्यातील विविध बाबी तपासून अंतिम अहवाल राज्य सरकारला व विद्यापीठाला सादर केला जाणार आहे.

अहवाल विद्यापीठाला मिळालेला नाही. तसेच राज्य सरकारलाही दिलेला नाही. त्यामुळे कारणामुळे डॉ. विंचूरकर यांच्याकडेही संशयाची सुई वळते आहे, असे आरोप होत आहेत. भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख लहू गायकवाड यांनी राज्यपाल, शिक्षणमंत्री, उच्च शिक्षण सहसंचालक, कुलुगरूंना दिलेल्या निवेदनात डॉ. अरुणा विंचूरकर या 13 कर्मचार्‍यांबाबत ‘तडजोड’ करण्याच्या भूमिकेत असल्याचा आरोप केला आहे. कॅ. डॉ. सोनजे यांनी अनुभवाचे बनावट दाखले देऊन विद्यापीठाची फसवणूक केली आहे. सॅलरी अँडिटमध्ये वेतनाबाबत त्रुटी आढळलेल्या 13 कर्मचार्‍यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

वेतन निर्धारण तपासणी । शिक्षण सहसंचालक कार्यालयाने केली तपासणी, राज्य सरकार किंवा विद्यापीठाला अद्याप अहवाल प्राप्त नाही

सॅलरी ऑडिट झाले असले तरी त्याचा अंतिम अहवाल अद्याप विद्यापीठाला प्राप्त झालेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील कार्यवाही निश्चित केली जाईल.’’ डॉ. एन. एन. मालदार, कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ

ही तर तपासणीची प्रक्रिया
सोलापूर विद्यापीठाचीच नव्हे तर 40 महाविद्यालयातील सर्वच कर्मचार्‍यांची वेतन निर्धारण तपासणीचे काम सुरू आहे. हे रूटीन काम आहे. विद्यापीठाबाबतच एवढी पेपरबाजी का होते आहे? वेतनात त्रुटी निघाली तर संबधित कर्मचार्‍यांकडून ती वसूल होतेच. कधी कधी तर पेन्शनमधून त्याची रिकव्हरी होते. कधी नियम माहीत नसतात, कधी जीआरचा चुकीचा अर्थ लावला जातो. यामुळे असे प्रकार घडतात. त्यात त्या कर्मचार्‍यांकडून फार मोठा गुन्हा झाला आहे, असे मुळीच नाही. अहवाल विद्यापीठाला लवकरच दिला जाईल. आरोप करणार्‍यांना नियमच माहीत नसल्याची खंत वाटते.’’ डॉ. अरुणा विंचूरकर, सहसंचालिका

वेतनत्रुटी आढळलेल्या अधिकार्‍यांची नावे
कुलसचिव कॅ. डॉ. नितीन सोनजे, साहाय्यक कुलसचिव अर्चना चोपडे, शिवाजी शिंदे, सिस्टिम अँनॅलिस्ट आनंद चव्हाण, प्रोग्रामर सुशील बनसोडे, कक्ष अधिकारी आनंद पवार, सोमनाथ सोन्नल, मलकारसिद्ध हैनाळकर, चोरमुले, सोनकांबळे, सूर्यकांत कांबळे आदी.

..तर लाखोंचा भुर्दंड
नियुक्तीच्या तारखेपासून वेतन त्रुटी सिद्ध झाले तर मात्र विद्यापीठाला मोठा आर्थिंक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. हे वेतन विद्यापीठ निधीतून कपात होईल. त्याचा थेट परिणाम विद्यापीठाच्या विकासावरच होणार आहे. नंतर या कर्मचार्‍यांकडून कायदेशीररीत्या वेतन रिकव्हर करण्यासाठी बराच कालावधी लागू शकेल.