आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur University, Latest News In Divya Marathi

सुविधा नसल्या तरी विद्यार्थी भरतीस विद्यापीठाचा होकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील सर्वच अभियांत्रिकी महाविद्यालयांनी यंदाच्या एका वर्षासाठी ‘विनाअट संलग्नते’च्या नियमातून सुटका करून घेतली आहे. सोलापूर विद्यापीठालाही इतर विद्यापीठांप्रमाणे सर्वच महाविद्यालयांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मान्यता द्यावी लागली. सोलापुरात 15 पैकी 8 अभियांत्रिकी महाविद्यालयांनी त्रुटींची पूर्तता न करताही विद्यापीठाची संलग्नता मिळवली. पुढील वर्षी मात्र विनाअट संलग्नता असेल तरच प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येईल. येत्या वर्षभरात त्रुटी पूर्ण करण्याच्या अटीवरच हा निर्णय घेण्यात आल्याचे बीसीयूडीचे संचालक डॉ. भीमाशंकर भांजे यांनी सांगितले.
सोलापूर विद्यापीठात जिल्ह्यातील अभियांत्रिकी व व्यावसायिक महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थापकांची कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, बीसीयूडी संचालक डॉ. भीमाशंकर भांजे यांच्यासोबत संयुक्त चर्चा झाली. तीत पुढील वर्षी विनाअट संलग्नता मिळवण्याच्या अटीवर यंदा या महाविद्यालयांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल, असे ठरले.
डीटीई या नियामक संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह धरून कठोर पाऊल उचलले होते. विनाअट संलग्नता मिळवलेल्या महाविद्यालयांनाच यंदा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल, असा निर्णय घेतला होता. त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयांनी डीटीई, शिक्षण विभाग व विद्यापीठांवर दबाव आणून निर्णय मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, विद्यापीठ, डीटीई यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देऊन 15 जूनपर्यंत त्रुटीपूर्तता करण्याचे सूचित केले. प्रत्यक्षात अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्या त्रुटींची पूर्तता न करताच हा निर्णयच मागे घेण्यास भाग पाडले.
या निर्णयात विद्यार्थी हित कोठे आहे?
पुरेसे व प्रशिक्षित प्राध्यापक नाहीत, पूर्णवेळ व नियमित प्राचार्य नाहीत, सुसज्ज ग्रंथालय आणि इतर सोयी सुविधा नाहीत अशा महाविद्यालयांना त्रुटीपूर्ततेच्या अधीन राहून विद्यापीठाशी संलग्नत्व मिळते. आता या बाबींची पूर्तता नसली तरी अभियांत्रिकी महाविद्यालयांतून प्रवेश देण्यास प्रारंभ होईल. म्हणजे गुणवत्तेला सोडचिठ्ठी देऊन विद्यार्थी हिताला डावलण्यात आले असाच याचा अर्थ होतो.
सर्व महाविद्यालये सहभागी
डीटीईच्या सूचनेनुसार विनाअट संलग्नतेचे परिपत्रक पाठवले होते. याबाबत सर्व विद्यापीठांच्या बीसीयूडी संचालकांची मुंबईत बैठक झाली. आता सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतील. डॉ. एन. एन. मालदार, कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ