सोलापूर - व्यवस्थापन शास्त्राच्या पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभ्यासक्रमाच्या परीक्षा एका झटक्यात 24 दिवस अगोदर घेण्याचा निर्णय झाला. जितक्या गतीने निर्णय झाला, तितक्याच गतीने तो फिरवण्यातही आला. अभियांत्रिकीचा निकाल मुदतीत जाहीर झाला नाही. त्यासाठी आंदोलन करावे लागले. सोलापूर विद्यापीठाचा परीक्षा विभागाचे कामकाज अडचणी सोडवण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याऐवजी उलट त्यात भर घालण्याच्या दिशेनेच धोरणे राबवत असल्याचे दिसत आहे.
सिंहगड इन्स्टिट्यूटने एमबीएच्या परीक्षा लवकर घेण्याचे विनंतीपत्र परीक्षा विभागास धाडले. त्यावर सर्व बाजूने विचार न करता, अन्य महाविद्यालयांना विश्वासात न घेता परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय झाला. जूनची परीक्षा मेमध्ये घेण्याचे जाहीर केले. मात्र, याला विद्यार्थ्यांनी आव्हान दिले. परीक्षेच्या तयारीसाठी मिळणारी मुदत कमी झाल्याची तक्रार करत विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गाठले. आंदोलनानंतर निर्णय मागे घेण्यात आला. सम-विषम सत्र क्रमांकाच्या परीक्षा वेळापत्रकात यंदापासून बदल करण्यात आला. मागील वर्षी परीक्षा ऑक्टोबरमध्ये 1, 3 व 5 सत्र तर मार्चमध्ये 2, 4 व 6 वे सत्र अशी झाली. पण, विद्यार्थी संघटना, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या दबावामुळे हा निर्णय याच सत्रापासून मागे घेतला गेला आहे. त्याचा ताण परीक्षा विभागावर आहे. संलग्न महाविद्यालये 124 आहेत. तब्बल 56 हजार विद्यार्थी 274 अभ्यासक्रमाच्या विविध परीक्षा देत असतात. त्याची नेटकी तयारी करण्याऐवजी अडचणी वाढवण्यातच परीक्षा विभागाचे निर्णय होत आहेत.
अभियांत्रिकीचे आंदोलन
एमबीएच्या आधी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना निकालासाठी आंदोलन करावे लागले. आंदोलन चिघळण्याची स्थिती निर्माण झाली होती. पदवी अभ्यासक्रमाचा (बीइ) निकाल तब्बल 120 दिवस रखडला. परीक्षा विभागाने कसाबसा निकाल लावला. एमइचे विद्यार्थी संख्येने कमी असल्यामुळे त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला नाही.
काही बाबतींत त्रुटी आहेत
विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सोलापूर विद्यापीटातील परीक्षा विभाग सक्षम आहे. यात शंका नाही. काही गोष्टींबाबतीत त्रुटी राहिल्या असतील. पण त्याचे निवारण करण्यासाठी पुरेसा कालावधी दिला पाहिजे, असे मला वाटते.’’ डॉ. एस. व्ही. लोणीकर, प्रभारी परीक्षा नियंत्रक, सोलापूर विद्यापीठ
समस्या सुटेनात । विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून न घेतल्याने त्रासात वाढच
वारंवार यावे लागू नये
एमबीए विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी विद्यापीठाने मंजूर केली. खरे तर परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता तर एमबीएच्या विद्यार्थ्यांवर आंदोलनाची, विद्यापीठाकडे धाव घेण्याची वेळ आली नसती. परीक्षा विभागाकडून विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकल्या जात नाहीत. याबाबतही विद्यापीठाने कार्यवाही करावी व विद्यार्थ्यांना वारंवार विद्यापीठाकडे यावे लागू नये.’’ गणेश डोंगरे, शहराध्यक्ष, एनएसयूआय
अधिकार्यांचे धोरण ‘हात वर’चे
एमबीएच्या परीक्षा आधीऐवजी पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्याची मागणी करत 100 विद्यार्थ्यांनी विद्यापीठात धाव घेतली. त्यातील चार प्रतिनिधी परीक्षा विभागातील साहाय्यक कुलसचिव अनिल जाधव यांना भेटले. मात्र, त्यांनी हा विषय महाविद्यालयीन पातळीवरचा असल्याचे सांगत हात वर केले. इथे आलातच कशाला? ज्या समस्या असतील त्या तुमच्या प्राचार्यांना सांगा, आम्ही काय एवढेच करायचे काय?, असे प्रश्न विद्यार्थ्यांनाच विचारले. काही विद्यार्थ्यांनी या वागणुकीचा निषेध केला.