आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहितीचे दरवाजे सोलापूर विद्यापीठाने केले खुले, पारदर्शक कारभारासाठी असतील 19 माहिती अधिकारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठात 19 विभाग असून प्रत्येक विभागाच्या प्रमुखाला माहिती अधिकारी म्हणून अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मागेल त्याला माहिती मिळणार आहे. सोलापूर विद्यापीठाने पारदर्शक कारभाराकडे टाकलेले अतिशय महत्त्वाचे पाऊल म्हणून या निर्णयाची नोंद होणार आहे.
माहितीच्या अधिकाराचा वापर करण्याची मुळात गरजच पडू नये, अशी आदर्श व्यवस्था निर्माण करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीही महत्त्वाची ठरणार आहे. वर्षभरापूर्वी कुलगुरूपदी डॉ. एन. एन. मालदार आल्यानंतर प्रशासनाने कात टाकली. कोणतीही माहिती त्वरित उपलब्ध करण्याकडे विद्यापीठाने कल ठेवला आहे.
तेव्हा माहिती दडवली जायची : आधीच्या काळात माहिती मागणारी व्यक्ती जणू विद्यापीठ विरोधीच आहे, असा आभास निर्माण केला जाई. कुलगुरूंचे निर्णय दडवण्याकडे अधिक कल असायचा. गुपचूप काम करणे हे धोरण बनले होते. माहिती अधिकाराखाली अर्ज केला तरी शब्दांची खेळी करून माहिती दडवली जात होती. सहजासहजी माहिती मिळू नये यासाठी अधिकारी वर्ग प्रयत्नशील होता. त्यामुळे पारदर्शक कारभाराचे तीन तेरा वाजले.
विद्यापीठ काय करणार ?
पूर्वी एकच माहिती अधिकारी होते. आता प्रत्येक विभागात माहिती अधिकारी
विद्या परिषद, व्यवस्थापन परिषद, सिनेटमधील सर्व निर्णय संकेतस्थळावर
मागील सभागृहातील निर्णयही संकेतस्थळावर उपलब्ध
माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करण्याची वेळच येऊ नये इतका पारदर्शी कारभार
सर्व माहिती संकेतस्थळावर
मागेल त्याला माहिती देणे हा नियमच आहे. माहिती अधिकाराचा वापर कमीत कमी करावा लागणे ही आदर्श पारदर्शकता असते. यामुळेच 19 माहिती अधिकारी नियुक्त केले. संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध करणे हा पर्याय विद्यापीठाने स्वीकारला आहे.’’ डॉ. एन. एन. मालदार, कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ
अभिनंदनीय निर्णय
सेक्शन चार अंतर्गत माहिती घेणे हा अधिकार आहे. 2005 मध्ये राष्ट्रपतींनी माहिती अधिकार लागू करण्याच्या निर्णयावर सही केली तेव्हापासून 120 दिवसांत सर्व प्राधिकरणांनी आपली माहिती आपणहून देणे बंधनकारक होते. विद्यापीठाने विशेषत: कुलगुरूंनी हा निर्णय घेतला, सर्व माहिती संकेतस्थळावरच मिळाल्यास विद्यापीठाने आदर्श समोर ठेवला, असे मी म्हणेन.’’ विद्याधर दोशी, माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते