आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावा वर्धापन दिन; विद्यार्थीच ब्रॅण्ड अँम्बेसेडर- कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा व्यावसायिक उपयोग झाला पाहिजे. नव्या योजना आणताना हा दृष्टिकोन समोर ठेवावा. विद्यार्थीच विद्यापीठाचे ब्रॅण्ड अँम्बेसेडर असतात’, असे मत स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर (नांदेड) यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.

सोलापूर विद्यापीठाच्या दहाव्या वर्धापनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार अध्यक्षस्थानी होते.
डॉ. विद्यासागर म्हणाले की, सोलापूर विद्यापीठ एका जिल्ह्यापुरते आहे. छोटे आहे. पण, हेच याचे बलस्थानही आहे. ते ओळखून कालानुरूप बदल स्वीकारत शैक्षणिक दर्जा, सामाजिक प्रतिष्ठा उंचवावी. सोलापूर विद्यापीठ निश्चित जागतिक आव्हानांना तोंड देत प्रगती साधेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांमध्ये क्षमता निर्माण करण्यासाठी ‘वन टीचर- वन स्कीम’ असा उपक्रम नांदेड विद्यापीठाने सुरू केला. नव्या नव्या योजना उत्साहाने मार्गी लागत असल्याचा अनुभव मिळत आहे. शिक्षकांची गुणवत्ता वाढीस लागावी, त्यांचा व्यासंग वाढावा हा उद्देशही त्यातून साध्य होतो.
कुलसचिव शिवशरण माळी यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. भीमाशंकर भांजे, नवनियुक्त परीक्षा नियंत्रक भटुप्रसाद पाटील आदी उपस्थित होते. प्रा. दीपक ननवरे यांनी सूत्रसंचलन केले. साहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी आभार मानले.
महाविद्यालयांना सामील करून घ्या
विद्यापीठाच्या जबाबदारीचे विकेंद्रीकरण केले पाहिजे. त्यात महाविद्यालयांनाही सामील करून घेतले पाहिजे. नांदेड विद्यापीठाने असा प्रयोग केला आहे. प्रथम वर्षाच्या परीक्षा घेण्याची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयांकडे सोपवली आहे. या जबाबदारी व विश्वास टाकण्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. सामान्यत: कोणत्याही बदलाला विरोध हा होतच असतो. तो लक्षात घेऊनच सकारात्मक बदल घडवणे अपेक्षित असते, असे डॉ. विद्यासागर म्हणाले.
वार्षिकांक पुरस्कार
सृजनरंग स्पध्रेतील विजयी वार्षिकांकांना पुरस्कराने गौरवण्यात आले. त्यात प्रज्ञा (संगमेश्वर), कर्मवीर (केबीपी, पंढरपूर), हिरा (हिराचंद नेमचंद), शिवामृत (शंकरराव मोहिते महाविद्यालय), (दीनबंधू) संतोष पाटील महाविद्यालय (मंद्रूप) यांचा समावेश होता. व्यावसायिक गटातून व्हिटनेस (वालचंद अभियांत्रिकी), ऑर्किडआरा (आर्किड अभियांत्रिकी), (बीमाइट) ब्रादेवदादा माने अभियांत्रिकी, विद्या (व्हीव्हीपी अभियांत्रिकी), अँग्लोमेरीयेशन (ए. जी. पाटील अभियांत्रिकी) यांचा समावेश होता.
विविध क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचा झाला पाहुण्यांच्या हस्ते सत्कार
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पध्रेत विजेतेपद मिळवल्याबद्दल केतन शिंदे, स्वामी विडप (स्विमिंग व डायव्हिंग), मुकुंद वाडकर (कुस्तीत सुवर्ण पदक), प्रा. बाळासाहेब वाघचवरे, प्रा. रामहरी नागटिकळ, प्रा. शांतीलाल मोरे (संघ व्यवस्थापक), स्वाती बनसोडे (गोळाफेक), अमोल तनपुरे (भालाफेक) यांचा सत्कार झाला.
विद्यापीठाने राबवले अनेकविध कार्यक्रम आणि उपक्रम
सकाळी आठला ध्वजवंदन झाले. सर्वांच्या सहकार्यातून विद्यापीठ प्रगती निश्चित साधेल. कार्यमग्नतेतून आणखी प्रगतिपथावर जाऊ यात, असा विश्वास कुलगुरू डॉ. मालदार यांनी व्यक्त केला. सामाजिक शास्त्र संकुलात रक्तदान शिबिर झाले. कुलगुरू डॉ. विद्यासागर यांच्या हस्ते रोप लावण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव
राजर्षी शाहू महाराज पुरस्काराने चांदणी मुलानीला गौरवण्यात आले. ती शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयाची (अकलूज) विद्यार्थिनी आहे. कर्मचार्‍यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार झाला. त्यात दहावीतील आदित्य हनुमंत राऊत, आदित्य शैलेश साखरे, आनंद रामचंद्र मोटे, शिवम वैभव पवार आणि बारावीतील प्रज्ञा दत्तात्रय हुळ्ळे, सुप्रिया सज्रेराव काळे, तर कराटे स्पध्रेतील स्वराज व सौरभ वसंत सपताळे यांचा समावेश होता.
आविष्कार शिष्यवृत्ती
आविष्कार शिष्यवृत्तीसाठी सारिका सगरे (कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय), आकाश गांधी (वालचंद अभियांत्रिकी), सुप्रिया आवारे (संगमेश्वर महाविद्यालय), जैनोद्दिन मुल्ला (सोशल महाविद्यालय) पात्र ठरले.