आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दिवसांआड पाण्याचे संकेत, 35 एमएलडीचा तुटवडा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विस्कळित पाणीपुरवठय़ामुळे नागरिक हैराण आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेत झालेल्या बैठकीत 35 एमएलडी पाण्याचा तुटवडा भासत असल्यानेच पाण्याचे नियोजन कोलमडल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. आता चार दिवसांआड पाण्याचा पर्याय समोर आला आहे.

आयुक्त अजय सावरीकर यांनी पाणीपुरवठा अधिकार्‍यांना तातडीने अहवाल देण्याचे फर्मान सोडले. महापौर अलका राठोड व सावरीकर यांनी ही आढावा बैठक घेतली. दरम्यान, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व बहुन समाज पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

अवेळी व दोन दिवसांआड ऐवजी तीन-चार दिवसांआड शहराच्या काही भागात पाणी मिळू लागले आहे. बापूजीनगर, विजापूर रोड परिसरातील झोपडपट्टी नंबर दोन, सोनीनगर, बाळीवेस आणि इतर भागात तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा विस्कळित झाल्याची कबुली स्वत: अधिकारीच देत आहेत. पदाधिकारी टँकर चालकास मारहाण करीत आहेत. संतप्त नागरिक स्टोअरमधील कर्मचार्‍यांना बाहेर ओढून मारहाण करीत असल्याची घटना घडूनही प्रमुख विरोधी पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष मूग गिळून आहे.

तर पोलिसांकडे जा..
सार्वजनिक आरोग्य अभियंता बी. एस. आहिरे, उपअभियंता विजय राठोड, गंगाधर दुलंगेंसह झोन अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. जादा टँकरची सोय करा, विंधन विहिरी दुरुस्त करा. मनुष्यबळ लागले तर पूर्तता करण्यात येईल, तक्रारी आणि मारहाणीचे प्रकार घडले तर पोलिसांपर्यंत पोहोचा, असा सल्ला आयुक्तांनी दिला.

बोंबाबोंब मोर्चा काढू
पाणीपुरवठा विस्कळित होण्यास अधिकारी व पदाधिकारी जबाबदार आहेत. महापालिकेकडे आपत्ती व्यवस्थापन नाही. नागरिकांना पाणी कधी येईल यांची माहिती नाही. दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आयुक्तांच्या घरावर बोंबाबोंब करत घागर मोर्चा काढू, असे निवेदन नगरसेवक आनंद चंदनशिवे, माशप्पा विटे, उषा शिंदे यांनी साहाय्यक आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना दिले.

चार पंपाने उपसा
उजनी पंप हाऊस येथे पाण्याच्या कमतरतेमुळे चार ऐवजी तीन पंप सुरू आहेत. चार पंप सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सोमवारी उजनी येथे जाऊन पाहणी केली. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकार्‍यांची बैठक घेऊन प्रभावी नियोजनासाठी अहवाल मागविला आहे.’’
अजय सावरीकर, आयुक्त