आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर मॅडम असे चालणार नाही; आम्ही काय उत्तर द्यायचे ते सांगा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहराला सुरळीत पाणीपुरवठा करणार्‍या 1.6 किलोमीटर जलवाहिनीचे काम एका महिन्यात होणार होते. या गोष्टीला आता चार महिने उलटले तरी काम अपूर्ण आहे. ‘महापौर मॅडम असे चालणार नाही. आमच्याकडे वारंवार विचारणा होते. तेव्हा आम्ही काय उत्तर द्यायचे’ अशा शब्दांत आमदार प्रणिती शिंदे यांनी महापौर अलका राठोड यांना सुनावले. जकात बंद झाल्यानंतर महापालिकेचे उत्पन्न थांबले. विकासकामांना खिळ बसली. याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेत बैठक आयोजित केली होती.

विकासासाठी 9 कोटी मिळणार - तेराव्या वित्त आयोगातून आजपर्यंत 18 कोटी रुपये आले असून, एलबीटीमधून आलेल्या 10 कोटीपैकी 5 कोटी शिल्लक आहेत. 18 कोटी रुपयातून 9 कोटी रुपये कर्मचार्‍यांच्या पगारासाठी आणि 9 कोटी रुपये शहराच्या विकासासाठी द्यावेत, अशी मागणी नगरसेवकांनी केली. यावर पी. वाय. बिराजदार यांनी प्रशासकीय अडचण समोर ठेवताच सभागृ़ह नेते महेश कोठे त्यांच्यावर भडकले. एलबीटी वसूल करा आणि पगारी घ्या, असे नागेश ताकमोगे म्हणाले. पैसे नसल्याचा बाऊ करून शहरातील साफसफाईसुद्धा केली जात नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

नगरोत्थानअंतर्गत रस्ते तयार करण्यासंदर्भात आम्ही अनेकवेळा बैठका घेऊन प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले तेव्हा चार पैसे हातात आलेत. मग रस्ते का तयार केले जात नाहीत, असे आमदार प्रणिती शिंदे विचारताच महापौर अलका राठोड यांनी त्यांना हळूच दबक्या आवाजात काहीतरी सांगितले. यानंतर त्या म्हणाल्या, ‘2014 पूर्वी तरी या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळेल का, आम्ही निवडणुकीला उभारू दे का नको हे सांगा. काही करून एका महिन्यात या कामाला सुरुवात व्हायला हवी’. आयुक्त साहेब महापालिके तील वातानुकूलित कक्षातून बाहेर पडा तोपर्यंत शहराची झालेली दयनीय अवस्था तुम्हाला समजणार नाही. एक काम सांगितले की तुम्ही तुमच्या असिस्टंटला सांगता आणि ते काहीतरी तांत्रिक समस्या सांगून कामाला ‘जैसे थे’चे रूप देतात. रस्त्यावर येऊन शहराची अवस्था पाहा, अशी मागणी नगरसेवक नाना काळे यांनी या वेळी केली.

सहा झोनचे आठ झोनमध्ये रुपांतर झाले. कर्मचार्‍यांच्या कामाची विभागणी करण्यात आली. मात्र, काही कर्मचारी आणि काही बिगार्‍यांना ती बदली मान्य नसल्यामुळे ते बदली झालेल्या झोनमध्ये रुजू झालेले नाहीत. यामुळे शहराच्या स्वच्छतेवर परिणाम झाला आहे, अशी तक्रार अनेक नगरसेवकांनी कली. यावर बदली झालेले जे कर्मचारी कामावर रुजू होत नाहीत अशांवर कारवाई करा, अशी सूचना आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.
बिराजदारांवर गरजले कोठे - मक्तेदार अनिल गवळी यांची बिले अदा होऊ नयेत, असे एका नगरसेवकाने पी. वाय. बिराजदार यांना लेखी पत्र दिल्यानंतर त्यांनी गवळी यांची बिले अडवली. याचा जाब सभागृह नेते महेश कोठे यांनी विचारताच उपस्थित अनेक नगरसेवकांनीही यामध्ये हात धुवून घेत बिराजदार यांच्यावर तोंडसुख घेतले. कोणीही पत्र दिले तर मक्तेदारांची बिले अडवणार का, सर्व कामे तोंड बघून केली जात आहेत. सर्वांना सरसकट 25 टक्के बिले अदा करा, अशी मागणी कोठे यांनी केली. आयुक्त अजय सावरीकर यांनी कोठेंची मागणी मान्य केली.

बैठकीस आयुक्त अजय सावरीकर, उपायुक्त डॉ. पंकज जावळे, सहा. आयुक्त पी. वाय. बिराजदार, उपमहापौर हारून सय्यद, पक्षनेते महेश कोठे, राष्ट्रवादी गटनेते दिलीप कोल्हे, स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, माजी महापौर आरीफ शेख, रफिक हत्तुरे, शिवलिंग कांबळे, बाबा मिस्त्री, फिरदोस पटेल, सुशीला आबुटे उपस्थित होते.

एलबीटी वसुलीबाबत हलगर्जीपणा नको - शहराच्या विकासासाठी पैसे असणे आवश्यक आहे. त्यासाठी एलबीटी वसूल करणे गरजेचे आहे. पैसे नसल्यामुळे शहराच्या विकासाला खिळ बसत आहे. त्यासाठी एलबीटी वसूल करण्याबाबत आता हलगर्जीपणा करू नका. वसुली मोहीम कडक करा, अशा सूचना आमदार शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या.