आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Solapur Water Supply Stop Due To Electricity Problem

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाण्याला पुन्हा विजेचा धक्का!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा बुधवारी विस्कळीत झाला. पश्चिम भागातील रेल्वे लाइन व पूर्व भागातील विडी घरकुल आदी परिसरात नळांना पाणी आले नाही.
पाणी नसल्याने लोकांची धांदल उडाली. अनेकांनी साठवून ठेवलेल्या पाण्यावर दिवस काढला. काहींनी हातपंप गाठले. पूर्वभागात हातपंपावर घागरीच्या रांगा लागलेल्या होत्या. दहा तासांनंतर काही भागातील नळांना पाणी आले. तेही शहराच्या काही भागातच.
वीज नसल्याने टाकळी, सोरेगाव व भवानी पेठ या तिन्ही जलशुद्धीकरण केंद्रात पंप बंद होते. दरम्यान, वीज उशिरापर्यंत बंद राहणार असल्याने पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. टाकळी केंद्राच्या जलवाहिनीला तीन ठिकाणी गळती असून त्याची दुरुस्ती करण्यात आली. दहा दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करू. त्यानंतर तो विस्कळीत होणार नाही, असे आश्वासन सार्वजनिक आरोग्य अभियंता बी. एस. आहिरे यांनी 19 मे रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिले होते. त्याच्या सुमारे पंधरा दिवसांतच ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत झाला.
एप्रिल-मेमध्ये वारंवार वीजपुरवठा बंद झाल्याने पाणीपुरवठा अनेकवेळा विस्कळीत झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप होता. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची विनंती वीज कंपनीच्या अधिकार्‍यांना करणार असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, तरीही स्थितीत बदल झालेला नाही.
वेळापत्रक कोलमडले - वीज मंडळाने शटडाऊन घेतल्याने पाकणी, भवानी पेठ, सोरेगाव, टाकळी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी उपसा करणारे पंप बंद होते. त्यामुळे शहरात पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. मंगळवारी पूर्व भागात पाणीपुरवठा करणे आवश्यक असताना बुधवारी करण्यात आला. रेल्वे लाइन भागात बुधवारी होणारा पाणीपुरवठा गुरुवारी होणार आहे. गावठाण भागातील पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक कोलमडले.
केंद्रात जुजबी काम - सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात फुटलेल्या जलवाहिनीचे काम अतिशय जुजबी झाले आहे. त्यामुळे तेथे पुन्हा गळती लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या गळतीत लाखो लिटर पाणी वाया गेले. पुन्हा गळती झाल्यास हाच धोका आहे.