आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्या तरूणाने एटीएम कार्डव्दारे मुंबईकराला गंडा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अँक्सीस बँकेच्या एटीएम कार्डद्वारे सोलापूरच्या तरुणाने तीन लाख बावीस हजार रुपयांना गंडा घातला असल्याची तक्रार मुंबई पोलिसात नोंदविण्यात आली. ही तक्रार फौजदार चावडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. फिर्यादी हे सध्या अमेरिकास्थित आहेत.

गोविंद प्रेमजी पटेल (वय 65, मूळ रा. नववी बिल्डिंग, साईधाम, मुंबई) यांनी मुंबई पोलिसात फिर्याद दिली होती. तक्रारीत संशयित आरोपीचा पत्ता राहुलनगर बाळे (सोलापूर) असा असल्याने संबंधित गुन्ह्याची नोंद सोलापूरच्या फौजदार चावडी पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आलेली आहे.

असा नोंदलाय घटनाक्रम

सेवानिवृत्त अधिकारी असलेले पटेल हे 1985 पासून अमेरिकेत राहतात. सोलापूर व मुंबईत राहण्यासाठी ते तीन महिन्यांसाठी आले होते. 7 जानेवारी ते 2 एप्रिल या कालावधीत ही घटना घडल्याचा संशय त्यांनी वर्तवला आहे. त्यांच्यासोबत कामासाठी बाळे येथील विजय नामक तरुण होता. नेहमी तो एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करायचा. विजय याच्याकडूनच ते एटीएमधून पैसे काढून घेत असत. बँक खात्यातून पैसे कमी झाल्याचे एप्रिल महिन्यात त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मुंबईत फिर्याद दिली. काही दिवसांनी ते अमेरिकेत राहायला गेले. या प्रकरणी सोलापूरच्या तरुणावर संशय व्यक्त केल्यामुळे हा गुन्हा तपासासाठी सोलापुरात आल्याची माहिती फौजदार दत्ता शिंदे यांनी दिली.

फिर्यादीने संशय व्यक्त केलेल्या विजयचा पत्ता राहुलनगर, बाळे, सोलापूर एवढाच दिलेला आहे. पटेल यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती घेण्यात येईल. त्यानंतर पैसे कसे आणि कोठून चोरीला गेले यासाठी ‘एटीएम’मधील सीसीटीव्ही रेकॉर्ड तपासता येईल, असे फौजदार दत्ता शिंदे यांनी सांगितले.