सोलापूर - ‘शिक्षक हाच खरा आदर्श असतो. पुरस्काराच्या निमित्ताने त्याच्या कार्याचा गौरव करून कौतुकाची थाप द्यायची असते. पण अलीकडच्या काळात आदर्श पुरस्कार मिळाल्यानंतर शिक्षक ओल्या पार्ट्या करतात. त्याचा विद्यार्थ्यांसह समाजजीवनावर परिणाम तर होतोच, तसेच मिळालेला पुरस्कार, देणारी संस्था व संयोजकांच्या उद्देशाचे मातेरे होईल. त्याऐवजी शिक्षकांनी सर्व कुटुंबीयांसमवेत स्नेहभोजनाचा कार्यक्रम करा,’ अशा शब्दांत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी शिक्षकांना कानपिचक्या दिल्या. जिल्हा परिषदेतर्फे शिक्षकदिनी आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
डॉ. माळी म्हणाल्या, ‘झेडपीमध्ये शिक्षकासंदर्भातील प्रश्नांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यांचे प्रश्न सोडवताना शिक्षण विभागाची दमछाक होते. त्यामुळे शैक्षणिक-गुणवत्ता विकासाकडे दुर्लक्ष होते. शिक्षकांच्या अस्थापनाविषयक कामकाजासाठी शासनाने स्वतंत्र विभाग सुरू करावा. राज्यस्तरीय िशक्षक संघटनांचे अनेक पदाधिकारी जिल्ह्यात असल्याने येथील संघटना फारच आक्रमक आहेत. त्यांच्या प्रश्नांसाठी आग्रही असणाऱ्या संघटनांच्या पदािधकाऱ्यांनी प्रथम शिक्षक असून संघटनेचे कामकाज हे दुय्यम आहे, याचे नेहमी भान ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.
सोपल म्हणाले,“शिक्षणावरील ध्येय व निष्ठा कायम ठेवून अध्यापन करणाऱ्या शिक्षकांमुळे देशाची भावी पिढी घडविण्याचे महान कार्य होते. शिक्षकांची बदली प्रक्रीया ही पूर्वी फारच किचकट बाब होती. पण,प्रशासनाने त्यामध्ये सुधारणा करून नवे नियम तयार केल्यामुळे बदली प्रक्रीयेचा खऱ्या गरजुंना फायदा मिळतोय. बदलत्या काळानुसार शिक्षक पद्धतीतही अनेक बदल झालेत. पूर्वी अ, आ अशी बाराखडी होती. पण, माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात ईलर्निग, ई-क्लासेस अशी, इ-ईची बाराखडी सुरु झालीय. पहिलीपासून इंग्रजी विषय आवश्यकच आहे. शिक्षक स्वतच्या कृतीने आदर्श निर्माण करतो. विद्यार्थी त्यांचेच अनुकरण करून पुढील वाटचाल करतात.
सभापती शिवानंद पाटील म्हणाले,“झेडपीतर्फे शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी सर्वांची शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क झेडपीतर्फे भरण्यात येते. पायाभूत सोयी सुविधा सर्व शाळांना पुरवल्यात. खासगी शाळांची वाढती संख्या, त्याकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना झेडपीच्या शाळांमध्ये वळविण्याचे मोठे आव्हान झेडपी शिक्षण विभागासमोर आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी म्हणाले,“शिक्षक, मुख्याध्यापक शाळेच्या वेळत त्यांच्या प्रलंबित कामांसाठी झेडपी व पंचायत समितीच्या आवारात फिरत असतात. ते प्रकार थांबविण्यासाठी स्वतंत्र सॉप्टवेअर विकसीत केले. त्यावर स्वताची माहिती अपडेट करून पाठविल्यानंतर त्याबाबतचा निर्णय तातडीने घेऊन त्याची पूर्तता करण्यात येईल. प्रत्येक शाळांमध्ये स्वतंत्र वाचनालय सुरु करण्यात येईल. त्यासाठी टप्या-टप्याने िनधी देण्यात येईल. शिक्षक गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्वतंत्र योजना विकसित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. विविध विषयातील तज्ज्ञ शिक्षकांचा गट तयार करून त्यांना व्याख्यानासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात येईल. जिल्ह्यातील ७१४ शिक्षकांच्या वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लावण्यात आल्याचे, त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्याहस्ते ११ जणांना आदर्श शिक्षक व ११ शिक्षकांना शिष्यवृत्ती परीक्षेतील उल्लेखनीय यशाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच, विस्तार अधिकारी प्रकाश जोशी यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले.
शिक्षणाधिकारी राजेंद्र बाबर यांनी प्रास्तविकात शिक्षण विभागाच्या कार्याची माहिती दिली. विस्तार अधिकारी जयश्री सुतार यांनी सूत्रसंचालन केले. उपशिक्षणाधिकारी मदारगनी मुजावर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास महिला व बालकल्याण समितीच्या सभापती जयमाला गायकवाड, पक्षनेते मकरंद निंबाळकर, विरोधी पक्षनेते महिबुब मुल्ला, सदस्य अप्पाराव कोरे, झुंजार भांगे, शीतल पाटील आदी उपस्थित होते.