आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली, दुसरीचे दप्तर रिकामे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शाळा सुरू होऊन चार दिवस झाले तरीही पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांचे दप्तर रिकामेच राहिले आहे. सरकारची पहिल्या दिवशी पुस्तक देण्याची घोषणा पोकळ आश्वासन ठरले आहे. दोन्ही वर्गांच्या पुस्तकांची छपाई झाली नसल्याने पुस्तके अद्याप जिल्हा व तालुक्यापर्यंत पोचलेली नाहीत.

राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे यावर्षी पहिली आणि दुसरीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला. त्यामुळे या वर्गातील संपूर्ण पुस्तकांची नव्याने छपाई करण्यात येणार होती. बालभारतीला वेळेवर अभ्यासक्रम देण्याची जबाबदारी एमसीईआरटीची होती. वेळेवर अभ्यासक्रम न दिल्याने पुस्तकांची छपाई झाली नसल्याने समजते.

महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमार्फत पहिली ते आठवीच्या पाठय़पुस्तकांसाठी अभ्यासक्रम तयार केला जातो. बालभारतीने तिसरी आणि आठवीपर्यंतची 90 टक्केपेक्षा अधिक पुस्तके जिल्हा व तालुकास्तरापर्यंत पोहोचवण्यात आली आहेत.

इंग्रजी, गणिताची 30 हजारच आली
प्राथमिक शिक्षण विभागाकडून पहिली आणि दुसरीसाठी चार लाख 96 हजार पुस्तकांची मागणी आली होती. इंग्रजी आणि गणिताची केवळ 30 हजारच पुस्तके आली आहेत. येत्या दहा ते पंधरा दिवसांत सर्व पुस्तके येणार आहेत.


स्वाध्याय पुस्तकांचा पुरवठाही तोकडाच
स्वाध्याय पुस्तकांचा संपूर्ण विभागात केवळ तीन टक्के पुरवठा झाल्याची माहिती आहे. विभागात 21 लाख 87 हजार स्वाध्याय पुस्तके आवश्यक असतात. त्यापैकी केवळ पाच लाख 72 हजार 800 स्वाध्याय पुस्तके दाखल झाली आहेत.

पाठपुरावा सुरू आहे
बालभारतीकडे सतत पाठपुरावा चालू आहे. पुण्यात छपाई करण्यास उशीर लागत असल्याने राज्यात सर्व ठिकाणी पुस्तकांचा पुरवठा करणे शक्य होत नाही. यामुळे पहिली आणि दुसरीची पुस्तके येण्यास थोडा विलंब लागणार आहे.’’
राजेंद्र बाबर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग