आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखोंच्या गाळ्यांचे हजारात मिळते भाडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पार्क चौकातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या नेहरू वसतिगृह इमारतीमधील 17 व्यापारी गाळ्यांमधून दर महिन्याला फक्त 22 हजार 491 रुपयांचे उत्पन्न मिळते. त्याच चौकातील महापालिकेच्या व्यापारी गाळ्यांना दरमहा तब्बल 8 ते 10 लाख रुपये भाड्यापोटी मिळतात. झेडपीच्या दुर्लक्षामुळे लाख मोलाची मालमत्ता कवडीमोल ठरत आहे.

जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत उत्पन्न वाढविण्याचा, मालमत्ता विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या अनेक जागांवर खासगी व्यक्ती, संस्थांचे अतिक्रमण झाले आहे. अनेक ठिकाणचे अतिक्रमण हटविण्यास झेडपीला पूर्णत: अपयश आले आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या नेहरू वसतिगृह इमारतीच्या आवारातील व्यापारी गाळ्यांची भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव सदस्य सुरेश हसापुरे यांनी मांडला अन् त्यास सर्वांनी मंजुरी दिली.

वसतिगृहातील काही मूळ गाळेधारकांनी विनापरवाना त्या ठिकाणी पोटभाडेकरू ठेवून हजारो रुपये भाड्यापोटी उत्पन्न मिळवत असल्याचे, झेडपी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या तपासणीत उघड झाले. पाच ते सहा गाळेधारक नियमित भाडे चलनाद्वारे झेडपीकडे भरतात. उर्वरीत गाळेधारकांपैकी काहींची गेल्या अनेक महिन्यांपासून थकबाकी असल्याचे, झेडपी शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.

काही गाळ्यांना आहे फक्त 13 रुपये 69 पैसे भाडे
वसतिगृहाच्या आवारात एकूण 17 व्यापारी गाळेत आहेत. एकूण 8 हजार 476.72 चौरस फूट क्षेत्रासाठी दर महिन्याला फक्त 22 हजार 491 रुपये 50 पैसे भाडे मिळते. काही गाळ्यांना फक्त 13 रुपये 69 पैसे, 19 रुपये 75 पैसे भाडे आहे. तीन गाळे एकत्रित करून वापरण्यात येत असून त्यासाठी झेडपीकडून कोणतीही परवानी घेतली नसल्याचे, जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.

महापालिकेला मिळणारे भाडे लाखोंच्या घरात
पार्क चौकामध्ये महापालिकेच्या मालकीचे 100 व्यापारी गाळे आहेत. पार्क मैदानाच्या परिसरात असलेल्या 69 गाळ्यांच्या भाडेवाढीचा प्रस्ताव चार महिन्यांपूर्वी महापालिकेच्या सभेत मांडण्यात आला. महापालिकेतर्फे त्या गाळ्यांना सरासरी 130 ते 155 रुपये चौरस मीटर दराने भाडेआकारणी करण्यात येते. त्याद्वारे महापालिकेला दर महिन्याला लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न भाड्यापोटी मिळते.

जिल्हा परिषदेचा भाडेवाढीचा निर्णय योग्य
गाळ्यांची भाडेवाढ करण्याचा झेडपीच्या सभेत झालेला निर्णय योग्य आहे. महत्त्वाच्या चौकात शंभर-दोनशे रुपये भाड्याच्या गाळ्यात दररोज हजारो रुपयांचा व्यवसाय होतो. काही गाळेधारक मोफत असून काहींना मात्र पाच ते आठ हजार रुपये भाडे आहे. प्रत्येक गाळ्याची जागा मोजून त्यास ठरलेल्या दरानुसार भाडे आकारणी करावी. त्याद्वारे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ होऊन ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल. संतोष पवार, गाळाधारक

गाळेधारकांना जिल्हा परिषद देणार नोटीस
नेहरू वसतिगृहातील गाळेधारकाकडून अल्प प्रमाणात भाडे आकरले जात असल्याचे तपासणीत आढळून आले आहे.उत्पन्न वाढीसाठी व्यापारी गाळ्यांची भाडेवाढ करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत झाला आहे. त्यानुसार गाळ्यांची जागा मोजून नवीन दराप्रमाणे भाडेवाढ करण्यात येईल. तसेच, पोटभाडेकरू ठेवणारे व विनापरवाना गाळे एकत्रित करून वापरणार्‍यांना गाळेधारकांना नोटीस देण्यात येईल. शिवाजी चंदनशिवे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक