आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेडपी कर्मचारी कुटुंबीयांचा आता निवडणुकीवर बहिष्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्या निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मान्य न झाल्यास जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या कुटुंबांकडून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनतर्फे देण्यात आला आहे. दरम्यान या आंदोलनाचाच एक भाग म्हणून मंगळवारी (दि. 19) काळ्या फिती लावून काम करणे तसेच भोजन कालावधीत निदर्शने करण्यात येणार आहेत.

शासनस्तरावर अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या आठवड्यात कर्मचारी युनियनची उस्मानाबाद येथे राज्याध्यक्ष बलराज मगर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आंदोलनाचा एक भाग म्हणून मंगळवारी (दि. 19) काळ्या फिती लावून कामकाज करण्यात येणार आहे. तसेच भोजन कालावधीत जिल्हा परिषदेच्या बाहेर निदर्शने करण्यात येणार आहेत. जर विधानसभा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या कुटुंबांकडून विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. दरम्यान जिल्ह्यात सध्या 12 हजार जिल्हा परिषद कर्मचारी कार्यरत असून, प्रत्येक परिवारातील सदस्यांची संख्या पाच गृहित धरल्यास 50 हजार मतदारांचा निवडणुकीवर बहिष्कार राहणार आहे. या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याध्यक्ष बलराज मगर, विवेक लिंगराज, कोषाध्यक्ष बी. टी. मोहिते यांनी केले.
झेडपी कर्मचारी युनियनच्या मागण्या
जिल्हा परिषदअंतर्गत लिपिक, लेखा संवर्गातील तसेच परिचर, वाहन चालकांचे ग्रेड
पे वाढवून मिळावे.

महाराष्ट्र विकास सेवा श्रेणी लिपिक वर्गीयांच्या पदोन्नतीचे प्रमाण लवकरात लवकर वाढवून द्यावे.
चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना पदोन्नतीचे प्रमाण 75 टक्के करून शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती देण्यात यावी.

अनुकंपा तत्त्वावर नेमणुकीची 10 % अट रद्द करून कंत्राटी ग्रामसेवक, प्रा. शिक्षक पदावर नियुक्ती करावी.

साहाय्यक लेखाधिकारी या पदावरून 100 टक्के पदोन्नतीने लेखाधिकारी वर्ग 2 ची पदे निर्माण करण्यात यावीत.

साहाय्यक प्रशासन अधिकारी या पदासाठी स्वतंत्र सेवा निर्माण करून गट ‘ब’ ची पदे पदोन्नतीने भरावीत.

गुणवंत कर्मचारी व पात्र कर्मचार्‍यांना आगाऊ वेतनवाढ द्यावी. विनंती बदलीची अट शिथिल करून एक वर्ष करावी.

कराराने केलेल्या नेमणुका प्रथम दिनांकापासून नियमित करण्यात याव्यात आदी मागण्यांचा समावेश आहे.

सर्व मागण्या आचारसंहितेपूर्वी मान्य करण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.
मुख्यमंत्र्यांना निवेदन
सोमवारी सोलापूरच्या दौर्‍यावर आलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेऊन झेडपी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत युनियनचे प्रदेश सचिव विवेक लिंगराज यांनी निवेदन दिले. संघटनांच्या मागण्या तत्काळ सोडवा, अशी विनंती करण्यात आली. या वेळी प्रभाकर कस्तुरे, राजीव गाडेकर, त्रिमूर्ती राऊत, राकेश सोड्डे, राजीव घाळे आदी उपस्थित होते.