आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Avinash Big Success, Killa Film Special Apperance In Australia

सोलापूरच्या आविनाशची झेप, ऑस्ट्रेलियात ‘किल्ला’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वडील सरकारी अधिकारी. त्यामुळे त्यांची एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात बदली व्हायची. त्यामुळे छोट्या अविनाशचे भावविश्व बदलत राहिले. मोठा झाल्यानंतर त्याने अनुभवविश्वाचा हाच धागा पकडून ‘किल्ला’ नावाचा संवेदनशील चित्रपट साकारला. या चित्रपटाने बर्लिन (जर्मनी), मामी (मुंबई), इफ्फी (गोवा) आदी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील समीक्षकांची मने जिंकली. आता १४ डिसेंबरला त्याचे ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये होणा-या ‘एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये विशेष प्रदर्शन होत आहे.

दिग्दर्शक- सिनेमॅटोग्राफर अविनाश अरुण ढावरे याचा हा जीवन प्रवास आहे. अविनाश मूळ सिद्धापूरचा. (ता. मंगळवेढा) त्याचे आजोळ मरवडे. सोलापुरातील दमाणीनगर भागात त्यांचे घर आहे. अविनाशने एफटीआयमध्ये सिनेमॅटोग्राफीचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. ‘किल्ला’ हा त्याचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट. छायांकनही त्यानेच केले आहे. ब्रिस्बेनमध्ये ‘एशिया पॅसिफिक’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची १४ डिसेंबरला ‘किल्ला’ चित्रपटाच्या प्रदर्शनानेच सांगता होणार आहे. ‘बेस्ट यूथ फीचर फिल्म’ या पुरस्कारासाठी त्याचे सादरीकरण असेल.

वडिलांचे सिनेमा व्यसन आणि सततची बदली
अविनाश म्हणाला, वडिलांना सिनेमा पाहण्याचे व्यसन होते. ते आणि त्यांचे नागा तुळशे हे मित्र दर आठवड्याला सोलापुरातील चित्रपटगृहांमध्ये दिसायचे. त्यांच्याकडून मला सिनेमा कसा पाहायचा याबद्दल समजून घेता आले. त्यांच्या प्रेरणेनेच मी पुण्याच्या एफटीआयमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या सततच्या बदलीमुळे आमचे कुटुंब या शहरातून त्या शहरात फिरत राहिले. सभोवताल बदलत राहिला. नवे मित्रही मिळाले, पण मागील आठवणींचा गुंता सतत वाढतच गेला. यातूनच मला ‘किल्ला’ची कथा सुचली. लहान मुलांचे विश्व फार मोठे नसते, पण त्यांच्या भावना आणि कल्पना लहान नसतात. त्याकडे आपण संवेदनशीलपणे पाहिले पाहिजे, हे सांगण्याचा मी प्रयत्न केलाय.

पुढे मंगळवेढा परिरसरातही करणार चित्रीकरण...
अविनाश म्हणाला की, वडील अरुण श्रीरंग ढावरे काही काळ लक्ष्मी विष्णू मिलमध्ये कामगार होते. काम करीत असतानाच त्यांनी एम.ए. एम.एड् केले. रयत शिक्षण संस्थेच्या बारामती येथील संस्थेमध्ये त्यांना नोकरीचा पहिला कॉल आला. त्यामुळेच आमचेकुटुंब सोलापुरातून बारामतीला आले. त्यानंतर वडील प्रशासकीय अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारीही झाले. कामानुसार त्यांची बदली होत राहिली. आमचे कुटुंबही मुरुड जंजिरा, पनवेल, तळेगाव दाभाडे, पिंपरी-चिंचवड अशा प्रवास करीत शेवटी पुण्यामध्ये स्थायीक झाले. सध्या मी एकटा मुंबईत राहतोय. तरीही सोलापूर, सिद्धापूरची आमची नाळ तुटलेली नाही. पुढच्या चित्रपटासाठी मी मंगळवेढा आणि परिसरात चित्रीकरण करणार आहे.

काय आहे किल्ला ?
किल्ला ही ७ शिकणा-या मुलाची कथा आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाले असून आईचीही सततच्या बदलीमुळे घालमेल होतेय. अशा परिस्थितीत त्याच्या मनात उमटणा-या भावना, ताणतणाव याचे चित्रण आहे. चित्रपटात अमृता सुभाष, श्रीकांत यादव, पार्थ भालेराव, अर्चित देवधर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

पटकाविलेले पुरस्कार :
> बर्लिन चित्रपट महोत्सवात ‘क्रिस्टल बेयर अवॉर्ड’
> मामी चित्रपट महोत्सव 'सिल्व्हर गेट वे ऑफ इंडिया’ अवॉर्ड
> मामी चित्रपट महोत्सव स्पेशल ज्युरी अवॉर्ड
(बर्लिन महोत्सवात स्थान मिळालेला किल्ला हा तिसरा मराठी सिनेमा आहे. यापूर्वी ‘सामना’ आणि ‘विहीर’ यांना हा मान मिळाला होता.)

‘झी टॉकीज’ करणार प्रदर्शन
‘किल्ला’ चे निर्मिती अधिकार आता ‘एस्सेल व्हीजन’ आणि ‘झी टॉकीज’ ने घेतले आहेत. त्यामुळे तो आता ‘झी टॉकीज’कडून मे महिन्यात सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.

आगामी...
अविनाश ‘दिव्य मराठी’ शी बोलताना म्हणाला की, मी एनएफडीसी सोबत ‘वीस म्हणजे वीस’, अनुराग कश्यम प्रॉडक्शनच्या हाऊससाठी ‘मसान’ आणि निशिकांत कामत याच्या ‘मदारी’ चित्रपटासाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करतोय.