आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solar Energy Save Seven Lakh For Solapur Jilha Parishad

‘सूर्या’शी मैत्रीमुळे सोलापूर जिल्हा परिषदेची तब्बल सात लाख रुपयांची बचत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करत सोलापूर जिल्हा परिषदेने उभारलेल्या सोलर पॉवर पॅकमध्ये तीन वर्षांत तब्बल सात लाख रुपयांची वीज बचत केली. ‘सूर्या’बरोबर केलेल्या मैत्रीचा फायदा सोलापूर जिल्हा परिषदेला झाला असून, कार्यालयातील दिवे, पंखे, संगणक पूर्णत: सौर दिव्यांवर सुरू असतात. सोलर पॅकच्या माध्यमातून दररोज सुमारे 988 युनिट वीज निर्मिती करणारी पश्चिम महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद होण्याचा बहुमान सोलापूरने पटकावला आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणारा निधी 2009-10 मध्ये अपारंपरिक ऊर्जा वापरासाठी वळवण्यात आला. सुरुवातीला अवघड वाटणारा हा निर्णय तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेंद्र सिंह व कृषी विकास अधिकारी रविशंकर चलवदे यांनी कल्पकतेद्वारे यशस्वी केला. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील चार विभागातील बल्ब, पंखे व संगणक सौर दिव्यांवर सुरू केले. योजना यशस्वी झाल्यानंतर सर्वाधिक निधी सोलर पॅकसाठी वळवण्यात आला. त्याचबरोबर सर्व आमदारांनी त्यांचा स्थानिक विकास निधीही या योजनेसाठी हस्तांतरित केला.

जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व कार्यालयांसह उत्तर व दक्षिण सोलापूर पंचायत समिती, दोन्ही तहसील कार्यालय, प्रांत अधिकारी कार्यालय सौर दिव्यांनी उजळले. त्यामुळे दररोज तब्बल 900 युनिट विजेची बचत होत गेली. प्रत्येक सोलर पॅक एक किलो व्ॉटचा आहे. जिल्ह्यात 58 पेक्षा जास्त संच उभारले आहेत. त्याद्वारे दररोज सुमारे 464 युनिट वीज बचत होते. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील उर्वरित 9 पंचायत समिती कार्यालये, माणकी (ता. माळशिरस) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सौर दिवे बसविण्यात आले असून त्यातून होणारी वीज बचत स्वतंत्र आहे. जिल्ह्यात आठ हजार सौर पथदिवे बसवण्यात आलेत. कृषी विभागातर्फे तब्बल 2000 सौरपथ दिवे बसवले असून 217 युनिट वीज बचत होते. तर, 459 सौर अभ्यासिकांमुळे 293 युनिट वीज बचत होते. याची ग्रामविकास मंत्रालयाने दखल घेतली. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी स्वत: सौर प्रकल्पाचे उद्घाटन करून सोलापूरचा पॅटर्न राज्यात लागू करण्याचे आश्वासन दिले होते.
आकडे बोलतात (सरासरीमध्ये)
अक्षय ऊज्रेची कास धरा
3,60,758 युनिट दरवर्षी वीजनिर्मिती
58 एकूण सोलर पॉवर संच
988 युनिट वीज दररोज निर्मिती
7,08,851 तीन वर्षांत एकूण वीज बचत व निर्मिती
एन. कॉम्प्युटिंगचा उपक्रम
जिल्हा परिषदेने एन. कॉम्प्युटिंग (नेटवर्क कॉम्प्युटर) हे नवे तंत्रज्ञान वापरात आणले आहे. त्याद्वारे एका सीपीयूला सहा मॉनिटर जोडण्यात आलेत. त्यामुळे पाच सीपीयू संच खरेदी व त्यांना लागणारी विजेची बचत झाली. त्यासाठी येणारा खर्च स्थानिक लोकप्रतिनिधी, सहकारी व खासगी साखर कारखान्यांकडून घेण्यात आला. झेडपीच्या मुख्यालयातील तब्बल 100 पेक्षा जास्त संगणक फक्त 21 सीपीयू द्वारे जोडण्यात आलेत.
कौतुकास्पद उपक्रम
झेडपी करतेय ऊर्जाबचत, दररोज होते 988 युनिटची निर्मिती, जिल्ह्यात बसवले आठ हजार सौर पथदिवे, वीज बचत करणारी पश्चिम महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद होण्याचा बहुमान