आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सॉलीवूड’च्या पहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण झाले पूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखन सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता विभागातील प्रा. बाबूराव माने यांचे. चित्रपटातील गुणी कलाकार सोलापूरचे आणि चित्रीकरण स्थळही सोलापूर शहर आणि परिसर. एकूणच काय तर ‘सॉलीवूड’चा हा पहिलाच चित्रपट. देवदासी प्रथेवर भाष्य करणारा, चौकटीबाहेरचा विषय हाताळणार्‍या ‘भोग-कर्माचा की नशिबाचा’ हा तो चित्रपट. याच्या अंतिम चित्रीकरणाचा टप्पा बुधवारी स्मृती उद्यान येथे पार पडला. सोलापुरातील हौशी कलाकारांना व्यावसायिक दृष्टी देणारा चित्रपट म्हणता येईल.

पुढील महिन्यात हा चित्रपट रसिकांपर्यंत पोचेल. विविध फिल्म फेस्टिव्हलसाठी चित्रपट नॉमिनेशनसाठी पाठवण्यात येणार आहे. तीन तासांचा हा चित्रपट असून चार दज्रेदार गाणी आहेत. दमदार दिग्दर्शन, पटकथा आणि युवा कलाकारांचा दज्रेदार अभिनय या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. युवा महोत्सव गाजवणारी विद्यार्थिनी निशिगंधा कापुरे हिची महत्त्वपूर्ण व मध्यवर्ती भूमिका आहे. तिचा हा दुसरा चित्रपट आहे. कलाक्षेत्रात करिअर करण्याचे तिचे स्वप्न व ध्येय आहे.

याशिवाय संजय शिंदे, शहाजी कांबळे, तेजस्विनी कांबळे, जावेद खान, दिनेश शिवशरण, राहुल वंजारे, अक्षता दहिहंडे, मोहिनी भोसले, दीपाली भोसले, किशोरी काकडे, बालकलाकार समृद्धी शिंदे आणि आदित्य माने यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाला संगीत प्रशांत देशपांडे यांचे आहे. चित्रीकरणातील कॅमेरा बाजू सुरेश संबाळ हा सांभाळत आहे. सर्व कलाकार विद्यार्थी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय आणि सोलापूर विद्यापीठ अधिविभाग यातील आहेत.

येथे झाले चित्रीकरण
स्मृतिवन, वृक्षमित्र बाबूराव पेठकर यांचे शेत, दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी, धर्मवीर संभाजी तलाव परिसर आदी विविध ठिकाणी चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण झाले.

>देवदासी विषयाची मांडणी करण्याचे आव्हान पेलताना चित्रपट वास्तवदर्शी बनवण्याचा प्रयत्न आहे. हौशी कलाकारांचा व्यवसायिक पद्धतीचा दमदार अभिनय चित्रपटाला उंची देणारा ठरेल.’’
-प्रा. बाबूराव माने, निर्माते