आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीच्या भिंती ओलांडून मूकबधिर सुनील, अर्चना येणार बंधनात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विवाह ही समाजातील सुखद संकल्पना मानण्यात येते. आयुष्याच्या जोडीदाराविषयी प्रत्येकाची काही स्वप्ने असतात. मात्र, ज्यांना नियतीने जगाचे म्हणणे ऐकण्याचे आणि आपले मत शब्दात मांडण्याचा अधिकारच दिला नाही. अशांना विवाह ही कल्पनाच ठरवू शकते. पण, सोलापुरातील एक मूकबधिर जोडपे याला अपवाद ठरले आहे. आपल्या व्यंगत्वाच्या जाणिवेसह एकमेकांना जोडीदार म्हणून स्वीकारण्याचा निर्णय या दोघांनी घेतला. रविवारी होणार्‍या लोकमंगलच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात हे वधू-वर विवाहबद्ध होत आहे.
सुनील गायकवाड आणि अर्चना म्हेत्रसकर असे या वधू-वराचे नाव आहे. दोघेही मूकबधिर आहेत. या व्यंगत्वावर मात करीत जीवनाच्या एका सकारात्मक वाटेने हे जोडपे एकमेकांना साथ देत पुढे जाणार आहे. सुनील आणि अर्चना या दोघांचेही शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. जोडीदार म्हणून सर्वसामान्य मुलगी अथवा मुलगा मिळणे कठीण होते. मूकबधिर व अंध वधू-वर मेळाव्यात अर्चनाचे नाव तिच्या आईने नोंदवले होते. मेळाव्यात पोहोचेपर्यंत कार्यक्रम संपलेला होता. त्यांनी संस्थापक प्रकाश यलगुलवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सुनील गायकवाड यांचे स्थळ सूचवले. दोघेही भिन्न जातीचे होते. जाती धर्माच्या भिंती दूर करून पाहण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर हुंडा, मानपान बाजूला ठेवत अखेर लग्न जुळले.
दोघेही स्वावलंबी
अर्चना कपडे शिलाईचे काम करते. विविध प्रकारच्या कपड्यांची शिलाई करण्याबरोबर ती दररोज 100 ते 200 टॉवेलचे तुकडे शिवते. त्या करिता तिला आठवड्याला 500 रुपये मिळतात. तर सुनील सुताच्या कारखान्यात डबलिंगचे काम करतो. दोघेही स्वावलंबी आहेत. कुटुंबाला त्यांच्यावर खर्च करण्याऐवजी ते आधार देतात.
मनासारखी निवड
जोडीदार म्हणून सुनीलची निवड करताना तो मला समजावून घेईल, हा विचार प्रथम केला. तो स्वत:च्या पायावर उभा आहे. एकमेकांना समजावून घेऊन आम्ही उत्तम संसार करू.’’ अर्चना म्हेत्रसकर, वधू
योग्य जोडीदार मिळाला
मी एका कु शल मुलीशी लग्न करतोय. ती शिकलेली आहे. त्याचे मला कौतुक वाटले. त्यामुळेच मी या लग्नाला होकार दिला. एकमेकांना आधार देणे खूप महत्त्वाचे होते. तो आधार आता मिळाला आहे.’’ सुनील गायकवाड, वर
सहजीवन
लोकमंगल प्रतिष्ठानच्या सामुहिक विवाह सोहळ्यातील आगळी जोडपी; मानपान, हुंडा सारले बाजूला, एकमेकांना समजून घेण्याचा भावी पती-पत्नीचा विश्वास