आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: खर्च झाला 28 लाख 86 हजार रूपये परंतु नाही रस्ते

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- हैदराबाद रस्त्यावरील कल्याणी पेट्रोल पंपाजवळ महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या कत्तलखाना परिसरात सुविधा पुरविण्यासाठी 28 लाख 86 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. या खर्चातूनच मुख्य रस्ता व दोन अंतर्गत रस्ते तयार करण्यात आल्याची नोंद महापालिकेत आहे. प्रत्यक्षात मात्र तेथे रस्ते कुठेच दिसून येत नाहीत. बंद पडलेल्या कत्तलखान्यातील लाखो रुपयांच्या यंत्रावर काही जणांनी डल्ला मारलेला असताना, सुविधांसाठी खर्च करण्यात आलेल्या पैशातही भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे.

कत्तलखाना उभारणीसाठी महापालिकेने 2 कोटी 10 लाख रुपये खर्ची केले. पाच वर्षांपूर्वी इतकी मोठी रक्कम खर्ची करूनसुद्धा आजतागायत कत्तलखाना चालू करण्यात आला नाही. एवढा खर्च करूनही इमारत धूळखात पडली आहे. कत्तलखाना उभारताना छोट्या जनावरांचा अर्धा भाग, 30 हजार लिटर्स पाण्याची टाकी, मुख्य अँप्रोच रस्ता व अंतर्गत दोन कच्चे रस्ते इतके काम 2005-2006 मध्ये करण्यात आले. या कामासाठी 28 लाख, 86 हजार रुपये खर्ची दाखवण्यात आले. या कामापैकी छोट्या जनावरांच्या कत्तलसाठी वेगळी इमारत, पाण्याची टाकी ही दोन कामे करण्यात आली आहे. मात्र, मुख्य अँप्रोच रस्ता आणि अंतर्गत दोन कच्चे रस्ते अद्यापही तयार करण्यात आले नाहीत. परंतु त्यांचा पूर्ण खर्च दाखवण्यात आला आहे. हैदराबाद रोडवरून कत्तलखान्याला जाणारा रस्ताच दिसून येत नाही. कत्तलखान्याला जाण्यासाठी फक्त एक पायवाट आहे. या परिसरात सर्वत्र शेती असल्यामुळे ही पायवाट आणि कच्चा रस्ता पूर्वीपासूनच आहे. दुचाकी घेऊन जाण्यासाठीच तारेवरची कसरत करावी लागते. मुख्य अँप्रोच रस्ताच नसताना अंतर्गत दोन कच्चे रस्ते तयार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते दोन कच्चे रस्तेच नाही. याबाबत माहिती देण्यास महापालिका टाळाटाळ करीत आहे. या गंभीर प्रo्नाबाबत पदाधिकारीही आवाज उठवत नाहीत.

भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत
कत्तलखाना उभारताना सर्व नियम धाब्यावर बसवून महापालिकेने मनमानी केले आहे. कत्तलखान्याला जाण्यासाठी मुख्य रस्ता आणि अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी पैसे खर्ची दाखवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात रस्ता कुठेच दिसत नाही. या भ्रष्टाचाराबाबत पुरावे आमच्याकडे आहेत. .’’
-विलास शहा, सामाजिक कार्यकर्ता

कच्चे रस्ते केले
हैदराबाद रोडपासून कत्तलखान्यापर्यंत आणि कत्तलखान्याच्या आवारात दोन अंतर्गत रस्त्याचे काम तेव्हाच पूर्ण झाले आहे. हे सर्व रस्ते कच्च्े रस्ते आहेत. वर्दळ काहीच नसल्यामुळे या रस्त्यावर गवत उगवले आहे. मात्र रस्ता केला नाही असे नाही. ’’
-सुभाष सावस्कर, नगर अभियंता, महापालिका