सोलापूर- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नव्या व्यक्तीकडे नेतृत्व सोपवावे व त्यांनी विश्रांती घ्यावी, असे वक्तव्य काँग्रेसचे नते ब्रार यांनी केले आहे. त्याचा शहरातील काँग्रेस नेत्यांनी निषेध केला असून सोनिया गांधी या जनमानसातील नेतृत्व असल्याने पक्षालाच नव्हे तर देशाला त्यांची गरज असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष, काँग्रेस
सोनिया व राहुल गांधी यांच्याबाबत असे वक्तव्य करणारे ब्रार हे पक्षाचे निष्ठावंत नाहीत असेच दिसून येते. पक्ष अडचणीत असताना असे प्रश्न उपस्थित होतात, काँग्रेस सत्तेत होती तेव्हा हेच नेते पक्षनेतृत्वाबरोबर होयबाची भूमिका घेऊन वागत होते. आज अचानक नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित करतात हे निषेधार्ह आहे. सोनिया गांधी जनमानसातील नेतृत्व आहे. काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आहेत. ते अशा असंतुष्टांना थारा देणार नाहीत.
अन्वर सैफन, सदस्य, केंद्रीय अल्पसंख्याक समिती
ब्रार यांनी या संदर्भात खुलासा केला आहे, आपण तसे बोललो नव्हतो असे त्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसजणांची निष्ठा ही सोनिया गांधी यांच्यावरच आहे. सत्तेत नसल्याने थोडीशी पडझड होतच असते, हा नवीन अनुभव नाही, किंवा सोनिया गांधी या कमकुवत नेत्या आहेत, असेही नाही. संधीसाधू नेते अशा अडचणीच्या काळात पक्षापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत असतात, त्यातीलच ब्रार हे एक नेते असावेत.
महेश कोठे, मनपा सभागृह नेता
काँग्रेसच्या नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यामुळे दहा वर्षे देशात काँग्रेस सरकार होते. त्यांच्याशिवाय पक्ष चालवू शकत नाही. या दोघांना पक्षातून विश्रांती दिली तर पक्ष शून्य आहे. त्यामुळे त्यांना पक्षातून विश्रांती देऊ नये. त्यांच्याकडे सक्षम नेतृत्त्व करण्याची क्षमता आहे.