सोलापूर- विधानसभा निवडणुकीपूर्वी चार दिवस विशेष मतदार नोंदणी अभियान राबविले जात आहे. शनिवारी या अभियानाचा पहिला दिवस. मात्र, शहरातील अनेक मतदान केंद्रात नियुक्त बीएलओ (ब्लॉक लेवल ऑफिसर) नसल्याचे दिसले तर काही बीएलओंनी आहे त्या ठिकाणी मतदार नोंदणीसाठी मतदारराजा आला नसल्याचे सांगण्यात आले. एकंदरीत मतदार व नियुक्त बीएलओ दोघांमध्ये मतदार नोंदणीमध्ये अनास्था असल्याचे दिसून आले.
लोकसभा निवडणुकीतील चूक दुरुस्त करण्यासाठी निवडणूक कार्यालयाने मतदान केंद्रनिहाय मतदार नोंदणीचा कार्यक्रम आखला आहे. 21, 22, 28 व 29 हे चार दिवस मतदान केंद्रावर पूर्ण दिवस बीएलओची नियुक्ती असणार आहे तर इतर दिवशी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत बीएलओ मतदार नोंदणीचा अर्ज स्वीकारणार असल्याचे निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र अनेक मतदान केंद्रावर बीएलओच दिसून आले नाहीत, ज्या मतदान केंद्रावर बीएलओ आहेत, त्यांनी चार-पाच अर्ज आल्याचे सांगितले.
खासदार बनसोडेंची तक्रार
निवडणूक कार्यालयाच्या वतीने मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. मात्र, अनेक मतदान केंद्रांवर बीएलओ नसल्याची तक्रार खासदार शरद बनसोडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे केली. बीएलओ नसल्याने मतदार नोंदणीसाठी भरलेला अर्जही तहसील कार्यालयात स्वीकारत नसल्याने अनेक मतदारांनी तक्रार केल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.