आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसआरपी वसाहतीमधील पोलिसाच्या घरातून चोरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरात चोरट्यांचे सत्र सुरूच आहे. तीन चोरीच्या घटना पुन्हा घडल्या आहेत. सोरेगाव येथील राज्य राखीव दल गट क्रमांक दहा येथील पोलिस विजयकुमार वाघ यांच्या घरातच चोरट्याने डल्ला मारला. 20 डिसेंबर रोजी ही घटना उघडकीस आली. सोमवारी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दाखल झाली. याशिवाय निर्मिती विहारमधून पाच तोळे सोने तर वाडिया हॉस्पिटलमधून फ्रीजसह काही वस्तू लंपास केल्या आहेत.

विजयकुमार वाघ यांचे 30 नोव्हेंबरपासून त्यांचे घर बंद होते. कडीकोयंडा उचकटून कपाटातील तीन तोळ्याच्या अगंठय़ा चोरीला गेल्या आहेत. ही घटना दोन दिवसांपूर्वी लक्षात आली. सोमवारी गुन्हा दाखल झाला. फौजदार पाटील तपास करीत आहेत.

निर्मिती विहारमध्ये चोरी
निर्मिती विहार येथील रहिवासी सोमलिंग सम्मनवर यांच्या घरातील तीन तोळ्याचे गंठण, दीड तोळ्याचे लॉकेट, अर्धा तोळ्याची अंगठी, रोख बावन्न हजार रुपये, दोन मोबाइल सेट चोरीस गेले. चोरट्यांनी सोमलिंग यांच्या घरातील जिन्यावरून घरात प्रवेश केला.

पोलिसांच्या उपाययोजनांकडे लक्ष
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांना वाढत्या गुन्हेगारीबाबत योग्य ती दखल घेण्याची सूचना केली होती. या संदर्भातील माहिती पत्रकारांशी बोलताना त्यांनी दिली होती. या घटनेस 48 तास उलटले नाहीत, तोपर्यंत पोलिसाच्या घरातच चोरी झाली. चोर्‍यांचे सत्र सुरूच असल्याने नागरिक भयभित आहेत. अशा घटनांवर नियंत्रण येणार की नाही असा सवाल आहे. पोलिस निरीक्षक, साहाय्यक आयुक्त यांच्या कामाचा आढावा घेण्यात यावा.

‘वाडिया’त चोरी
वाडिया हॉस्पिटलमधून दोन फ्रीज, विद्युत मोटार, मायक्रोव्हेव भांडी, बॅटर्‍या आदी 62 हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेले आहे. महेश पानसरे यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे. 23 डिसेंबर रोजी ही चोरी उघडकीस आली आहे. हनमंतु केंजनाळकर (वय 18, रा. धाकटी इराण्णावस्ती) याला अटक झाली आहे. आणखी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. चोरांनी खिडकीचा गज वाकवून त्यातील साहित्य चोरले होते.