आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिजोरीचे लॉक न उघडल्यामुळे आठ लाख वाचले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येरमाळा - कळंब तालुक्यातील येरमाळा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा लुटण्याचा सराईत दरोडेखोरांचा प्रयत्न तिजोरी न उघडल्यामुळे फसला. तिजोरीच उघडता आली नसल्यामुळे आठ लाख रुपये वाचले. दरोडेखोरांनी बँकेतील सर्व सुरक्षा यंत्रणा निष्प्रभ केल्या असून, हा प्रकार शनिवारी (दि. 7) मध्यरात्रीनंतर 2 ते 4 वाजेदरम्यान घडला.

दरोडेखोर बँकेच्या पाठीमगील बाजूने संरक्षक भिंत पार करून चॅनल गेटपर्यंत आले. गेट व आतील दरवाजा तसेच अन्य दरवाज्यांची सर्व कुलूपे गॅस कटरने तोडली. बँकेत तीन तिजोर्‍या आहेत. त्यापैकी आतल्या बाजूला असलेल्या तिजोरीत आठ लाख रुपये होते. अन्य दोन तिजोर्‍यांमध्ये कागदपत्र व चाव्या होत्या. त्यांनी तीन्ही तिजोर्‍या गॅस कटरने तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा उपयोग होऊ शकला नाही. या तिजोर्‍यांवर गॅस कटरचा खूप वेळ आघात करण्यात आला. सफाई कामगार नंदू चांगदेव पवार बँकेत आल्यावर हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी अधिकार्‍यांना मोबाइलवरून याची माहिती दिली.

शाखाधिकारी असरार अहमद काझी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. चव्हाण करीत आहेत.

सराईत गुन्हेगार

दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केल्यानंतर सर्व सीसीटीव्ही कॅमेरे वायर तोडून बंद केले. यामुळे त्यांचे कृत्य कॅमेर्‍यात कैद होऊ शकले नाही. यावेळी फायर अलार्म, सेफ्टी सायरनही निष्क्रिय करण्यात आला. दरोडेखोरांनी लॅन्डलाइन फोनची केबलही तोडली आहे. ही सर्व कामे एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून केली जाऊ शकतात. यावरून सर्वजण सराईत असल्याचे दिसून येत आहे.

तीन तास पाहणी
या दरोड्याच्या प्रयत्नामुळे पोलिसही चक्रावून गेले. घटना घडल्यानंतर तत्काळ तपास सुरू केला. ठसे तज्ज्ञांनी सुमारे तीन तास कसून शोध घेतला. तसेच शाखाधिकार्‍यांच्या कक्षातील कॉम्प्युटरच्या मॉनिटरवरील हातांचे ठसे तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत. दरोडेखोरांनी नासधूस करून चार लाख रुपयांचे नुकसान केले आहे. आठ वर्षांपूर्वीही याच बँकेत चोरीचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी दुचाकी चोरून नेण्यात आली होती. योगायोग म्हणजे काझी हेच शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते.

बँकेला गरज सुरक्षारक्षकाची
18 वर्षांपासून सुरू झालेल्या या शाखेतून 20 पेक्षाही अधिक गावांचा आर्थिक व्यवहार सुरू आहे. शाखेचे एटीएम मशिनही सुरक्षारक्षक नसल्यामुळे बँक वेळेतच सुरू ठेवले जाते. आता तरी येथे बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी बोध घेऊन सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे.