आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Bank's Intitive : Starting New Branches In Remote Area

स्टेट बँकेचा उपक्रम : शाखा नसलेल्या भागात केले एक लाख 29 हजार खातेदार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - बँकिंग सुविधाच अद्याप ज्या गावांमध्ये पोचलेली नाही, अशा गावांमध्ये बँक ऑफ इंडियाकडून ‘बँक आपल्या दारी’ हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात आला. अल्पावधीमध्येच बँकेने जिल्ह्यातील दोन हजारांपेक्षा कमी लोकसंख्येच्या गावातून एक लाख 29 हजार नवीन खातेदारांना ग्राहक करून सेवा उपलब्ध केली. या माध्यमातून बँकेने बेरोजगारांना रोजगाराचीही संधी उपलब्ध केली आहे.


वित्तीय अंतर्भाव कार्यक्रमातंर्गतचा उपक्रम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वित्तीय अंतर्भाव कार्यक्रमातंर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 2001 च्या जनगणनेमध्ये असे आढळून आले, की बहुतांश कुटुंब बँकेच्या सेवेपासून वंचित आहेत. खेड्यापाड्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत जर बँकिंग सेवा पोचवायची असेल तर आता असलेल्या बँकांच्या शाखा आणि मनुष्यबळ अपुरे आहे. यावर उपाय म्हणून बँक ऑफ इंडियाने व्यवसाय मदतनीस ही संकल्पना पुढे आणली. दोन हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 85 गावांमध्ये व्यवसाय मदतनीस नियुक्त करून बँकेने जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत एक लाख 29 हजार नवीन खातेदार केले.


व्यवसाय मदतनिसांची कार्यपद्धती : व्यवसाय मदतनीस लॅपटॉप घेऊन प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचतात आणि वन मॅन बँकिंग पद्धतीने संबंधित गावांमध्ये 24 तास बँक सेवा उपलब्ध होते. जिल्ह्यातील 85 गावांपैकी 21 गावांमध्ये पैसे काढण्याचीही सोय उपलब्ध आहे. बचत खाते उघडणे, ठेवी स्वीकारणे, बँकिंग सेवेचा प्रचार व प्रसार करणे, कर्ज प्रकरणांचे अर्ज भरून घेणे, लोकांना मार्गदर्शन करणे आणि शिफारशींसह कर्ज मागणीचे अर्ज बँकेकडे पाठवणे आदी कामे व्यवसाय मदतनीसांकडून सुरू आहेत. याच बरोबर कर्जाची वसुली करण्याचेही काम त्यांच्याकडून केले जात आहे. वीस मदतनीसांमागे एक चॅनल मॅनेजमेंट पार्टनर नियुक्त असून तो मार्गदर्शन करतो.


व्यवसाय मदतनिसांना मानधन : व्यवसाय मदतनीस म्हणून काम करणार्‍यांना पहिल्या सहा महिन्यांसाठी 3500 रुपयांचे दरमहा मानधन दिले जाते. त्यानंतरच्या कालावधीत बँक सुविधा ग्राहकांना दिल्यानुसार त्यांना कमिशन देण्यात येते. या उपक्रमामुळे आपल्याच गावात बँकिंगचे काम करून रोजगार मिळवण्याची संधी बँक ऑफ इंडियाने सुशिक्षित बेरोगारांना उपलब्ध केली आहे. परंतु, दुर्दैवाने यामध्ये महिलांचा समावेश अगदीच अल्प असून महिलांनी पुढे येण्याचेही आवाहन बँकेने केले आहे.


सोलापूरचा मदतनीस देशात पाचव्या स्थानी : बार्शी तालुक्यातील पांगरीलगतच्या उक्कडगाव या अगदीच ग्रामीण भागातील व्यवसाय मदतनीस विष्णू अर्जुन लाडे यांचे काम इतके उत्कृष्ट आहे की, त्यांचा पॅन इंडियामध्ये पाचवा क्रमांक आहे.

शहरातही बँक आपल्या दारी

ग्रामीण भागात यशस्वीरीत्या उपक्रम राबविल्यानंतर बँकेने आता शहरी भागातही बँक आपल्या दारीचा उपक्रम सुरू केला आहे. शहरातील ज्या भागात बँकिं ग सेवा उपलब्ध नाही अथवा त्या भागातील लोक बँकेपर्यंत पोचलेलेच नाहीत, अशा 11 भागात मदतनीसांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्यक्ष 7 ठिकाणी मदतनीसांनी आपले कामही सुरू केले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनासाखी बँक ऑफ इंडियाने ‘बँक आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केलेला आहे. गेल्या तीन वर्षात या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण भागाप्रमाणेच आता शहरी भागातही हा उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे. छोटे शेतकरी, अल्प उत्पन्न गटातील कुटुंब, रोजंदारी कामगार, गृहिणी यांनी योजनेचा लाभ घ्यावा.’’ नंदकुमार डोईजड, उपप्रादेशिक व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया