आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंदोलन : परिवहनचा अचानक संप; तीन तास सेवा विस्कळीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दोन महिन्यापासून वेतन होत नसल्याने संतप्त झालेल्या परिवहन कर्मचा-यांनी मंगळवारी अचानक सकाळी संप पुकारला. सकाळी तीन तास शहरातील परिवहन सेवा ठप्प होती. अखेर माजी महापौर आरिफ शेख, परिवहन सभापती आनंद मुस्तारे, व्यवस्थापक प्रदीप खोबरे यांनी मध्यस्थी करत 12 जुलै रोजी वेतन करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कर्मचा-यांनी संप मागे घेतला.

परिवहन कर्मचा-यांचे वेतन दोन महिन्यापासून थकीत असल्याने त्यांच्या पाल्याच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा? असा प्रश्न कर्मचा-यांपुढे आहे. पण, परिवहन समिती याची दखल घेत नसल्यामुळे कर्मचा-यांनी आज संपाचे हत्यार उपसले. पहाटे पाच ते आठ या वेळेत हा संप सुरू होता. अचानक संप पुकारण्यात आल्याने सकाळच्या सत्रात विद्यार्थी व चाकरमान्यांचे हाल झाले. तीन तासाच्या बंदनंतर माजी महापौर आरिफ शेख, सभापती आनंद मुस्तारे, व्यवस्थापक प्रदीप खोबरे यांनी कर्मचा-यांशी चर्चा केली. 12 जुलै रोजी मे महिन्याचे वेतन देण्याचे समितीने मान्य केल्याने संप मागे घेण्यात आला.

खर्चाचा अतिरिक्त भार
- साधे बसचे उत्पन्न प्रति किमी 30 रुपये असून खर्च 42 रुपये आहे. युरो फोरच्या डिझेलमुळे प्रतिलिटर सात रुपये जादा खर्च आहे. डिझेलची किंमत वाढल्याने दरमहा 50 हजार रुपये अतिरिक्त भार पडत आहे. या सर्व प्रकारामुळे परिवहनच्या उत्पन्नात घट होत आहे. त्यामुळे कर्मचा-यांचे वेतन थकले आहे.’’ प्रदीप खोबरे, परिवहन व्यवस्थापक

उत्पन्न कमी, खर्च अधिक असल्याने परिवहन अडचणीत
- शहरात परिवहनच्या 70 सिटीबस दररोज धावतात. त्यातून मनपास 4.5 लाखांचे रोज उत्पन्न मिळते. पण खर्च सात लाख आहे. त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च अधिक असल्याने परिवहन सेवा अडचणीत आली आहे.
- मनपाची अंदाजपत्रक सभा न झाल्याने दोन महिन्यापासून मनपाकडून अनुदान मिळाले नाही. दोन महिन्यापासून वेतन न झाल्यामुळे कर्मचा-यांनी आंदोलन केले.