आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मूर्ती कारखान्यातील धुळीचा त्रास; पंचनामे करण्याचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- येथील प्रदक्षिणा रस्त्यावरील गांधीरोड भागात दगडाच्या मूर्ती बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. या कारखान्यांमधून हाताने तसेच मशिनद्वारे दगडाच्या मूर्ती बनविल्या जात असल्याने या भागात उडणारी प्रचंड धूळ तसेच दगडाच्या छर्‍यांचा नागरिकांना तसेच प्रदक्षिणा करणार्‍या भाविकांना त्रास होत आहे. त्यामुळे पालिकेच्या अधिकार्‍यांनी या कारखानदारांना नोटिसा काढून आपले कारखाने गावाबाहेर नेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.
येथील प्रदक्षिणा रस्त्यावरील गांधीरोड भागात दगडापासून देवदेवतांच्या मूर्ती घडविण्याचे अनेक कारखाने आहेत. येथील मूर्तींना राज्याच्या विविध भागातून प्रचंड अशी मागणी असते. या भागातील कारखानदार आपले कारखाने सोडून सर्रास रस्त्यावरच मूर्ती घडविण्याचे काम करीत असल्याचे दिसून येते. या कारखान्यातून हाताने तसेच बर्‍याच वेळा यंत्रांच्या साहाय्याने मूर्ती घडविली जात असते. ही मूर्ती घडवित असताना दगडाची जी धूळ असते ती सतत हवेत उडत असते. त्याचप्रमाणे मूर्ती घडवित असताना दगडांचे जे छर्रे उडत असतात तेदेखील रस्त्यावरच पडलेले दिसून येतात.
येथील प्रदक्षिणा रस्त्यावरून बारमाही नगरप्रदक्षिणा करणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे. अनवाणी पायांनी भाविकांकडून नगरप्रदक्षिणा केली जात असते. त्यामुळे या भागातून जात असताना भाविकांना अशा उडणार्‍या धुळीचा तसेच दगडांच्या छर्‍यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. या भागात बरीच दुकाने आहेत. दगडाच्या मूर्तीच्या उडणार्‍या धुळीमुळे या दुकानमालकांना दिवसातून किमान तीन ते चार वेळा दुकानांची स्वच्छता करावी लागते.
दररोज प्रचंड उडणार्‍या या सततच्या धुळीमुळे दुकानांमधील ठेवलेला माल देखील लवकर खराब होत असल्याच्या तक्रारी या रस्त्यावरील बर्‍याच दुकानमालकांकडून केल्या जात आहेत. देवदेवतांच्या दगडी मूर्ती चक्क रस्त्यावरच कडेला ठेवण्यात येत असतात. काही कारखानदारांनी तर मोठय़ा रस्त्यांवर जागा अपुरी पडत असल्याने चक्क या परिसरातील बोळांमधून ही अशा मूर्ती ठेवल्याचे दिसत आहेत. त्यामुळे या भागातून बर्‍याच वेळा वाहतुकीला अडथळा होतो, अशी तक्रार आहे.
नोटीस बजावणार
या भागातील नागरिकांच्या तक्रारींमुळे आपण संबंधित कारखानदारांना नोटिसा देऊन तिथे मूर्ती घडविण्याचे काम थांबविले होते. त्यानंतर बर्‍याच कारखानदारांनी शहराबाहेर मूर्ती घडविण्याचे काम सुरू केले होते. मात्र, पुन्हा जर या भागातील नागरिकांच्या तक्रारी असतील व त्या ठिकाणी मूर्ती बनविण्याचे काम चालू असेल तर येत्या काळात पालिकेच्या वतीने अशा कारखानदारांना पुन्हा नोटिसा काढून त्या ठिकाणी सुरू असलेले मूर्ती बनविण्याचे काम बंद केले जाईल. सुनील वाळूजकर, प्रशासनाधिकारी, न. पा.
श्वसनाच्या आजाराची भीती
वारंवार उडणार्‍या अशा प्रकारच्या धुळीमुळे फुप्फुसामध्ये दमा (अस्थमा आणि सीओपीडी) याचबरोबर विविध प्रकारच्या अँलर्जीपासून निर्माण होणारे आजार उद्भवण्याची शक्यता असते. डॉ. प्रविदत्त वांगीकर, एम.डी.
पंचनामे करण्याचे आदेश
धुळीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या संदर्भात पालिकेकडे वारंवार तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. पालिकेने या तक्रारींची दखल न घेतल्याने प्रांताधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज दिलेले आहेत. प्रांताधिकार्‍यांनी या भागातील कारखानदारांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊनदेखील पालिकेकडून अद्यापही ठोस कार्यवाही झालेली नाही. अँड. वैभव टोमके, परिसरातील नागरिक