आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; संघर्ष पुन्हा तीव्र होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सहकारमहर्षी शंकरराव मोहिते यांच्या पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ मोहिते समर्थकांनी काढलेला विराट मोर्चा, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संजय शिंदे यांनी जिल्हा बँकेतील मोठ्या थकबाकीदारांविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेली तक्रार, करमाळा विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी, या सर्व घटना राष्ट्र वादीतील अंतर्गत धुसफूस आणखी तीव्र होणार असल्याचे सांगत आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्र वादी काँग्रेसमधील सर्व गट-तट विजयसिंह मोहिते यांच्यासाठी एकत्र आले होते. राष्ट्र वादीचे ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक, आमदार बबनराव शिंदे, आमदार दीपक साळुंखे, आमदार श्यामल बागल यांनी पुढील काळात मोहितेंना विरोध करण्याऐवजी एकत्र राहून काम करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे मोहिते आणि आमदार बबनराव शिंदे यांच्यातील दुरावाही आता कमी झाला. मात्र मोहिते आणि संजय शिंदे यांच्यातील राजकीय वैर अद्यापही संपलेले नाही. ते आणखी गडद होणार असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा बँकेतील महत्त्वपूर्ण संघर्ष

मोहिते गटाने नुकत्याच काढलेल्या मोर्चात पूर्णपणे जिल्हा परिषदेतील शिंदे गट टार्गेट होता. निषेध सभेच्या मंचावरून बोलणारे बहुतांश लोक उपमुख्यमंत्री अजित पवार, शिंदे यांना बोचतील, असेच शब्द वापरत होते. उर्वरित लोक हे आपल्या भागातील प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू असल्याचे दाखवून देत होते. मोहितेंनी संपूर्ण जिल्ह्यातून लोक आणले होते. त्यामुळे मोहितेंना नेमके काय साधायचे आहे? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे.

पवारांचे बळ, करमाळ्यात मोर्चेबांधणी
करमाळा विधानसभा मतदारसंघात सध्या संजय शिंदे जोदार मोर्चेबांधणी करीत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर संजय शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोनवेळा भेट घेतली होती. या भेटीनंतरच करमाळ्याच्या राजकारणात रंग आला आहे. आता पवारांनी मांडलेला हा नवा डाव मोहिते गट, करमाळ्याचा बागल गट विरुध्द शिंदे गट असाही संघर्ष घडविणार आहे. बागल गटाने अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत, मात्र मोहिते व बागल यांच्या गुप्तगू सुरू असल्याची चर्चा आहे.

थकबाकीदारांची करणार कोंडी
संजय शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे जिल्हा बँकेतील थकबाकीसंदर्भात लेखी तक्रार केलेली आहे. या थकबाकीदारांमुळे बँकेचे आणि राष्ट्र वादी काँग्रेसचे भविष्यात मोठे नुकसान होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा बँकेतील काही मोठ्या थकबाकीदारांमध्ये पालकमंत्री दिलीप सोपल, बँकेचे अध्यक्ष दिलीप माने, खासदार विजयसिंह मोहिते, ज्येष्ठ संचालक सुधाकर परिचारक यांच्या खासगी उद्योगांचा समावेश आहे. यातील मूळ विरोधकांची कोंडी करण्यासाठीच शिंदेंनी मोर्चेबांधणी केल्याची चर्चा जिल्हा बँकेच्या वर्तुळात आहे. यामुळे भविष्यात मोठा अंतर्गत संघर्ष उद्भवणार आहे.