आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stone Pelting In Raju Shetty Rally News In Marathi

राजू शेट्टींच्या सभेवर दगडफेक; सोलापूर जिल्ह्यातील श्रीपूर येथील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व माढय़ातील उमेदवार सदाभाऊ खोत यांच्या श्रीपूर येथील सभेवर काही कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. यात दोन जण जखमी झाले. सोमवारी रात्री ही घटना घडली. दरम्यान, शेतकरी संघटनेचे प्रदेश सचिव संजय पाटील-घाटणेकर यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर सभा पुन्हा सुरू झाली.

माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांच्या प्रचारार्थ श्रीपूरला सभा होणार होती. खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे, शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष उत्तम जानकर आदी नेते व्यासपीठावर होते.

या वेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा माळशिरस पंचायत समितीचे सदस्य के. के. पाटील यांनी श्रीपूरमध्ये बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मुद्दय़ाला हात घातला. ते म्हणाले, पुतळयाची किंमत अवास्तव सांगण्यात येत असली तरी त्याची किंमत खूपच कमी आहे. शिल्पकाराकडे मी चौकशी केली असता तो पुतळा पंचधातूचा नसून फायबरचा असल्याचे सांगितल्याचे ते म्हणाले. यामुळे महाराजांचा अवमान झाल्याचा राग धरून काही कार्यकर्त्यांनी पाटील यांच्यावर हरकत घेतली. तसेच अज्ञात कार्यकर्त्यांनी सभेवर दगडफेक केली. यात दोघे जखमी झाले.

परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी संजय पाटील-घाटणेकर यांनी झाल्या प्रकाराची दिलगिरी व्यक्त केल्यानंतर सभा पुन्हा सुरू झाली.

मतदार सुज्ञ आहेत : शेट्टी
खासदार राजू शेट्टी म्हणाले, ही दगडफेक म्हणजे भ्याड कृत्य आहे. ही विचारांची लढाई आहे. परंतु, खालच्या पातळीवर राजकारण सुरू आहे. सुज्ञ मतदार त्यांचा राग मतपेटीतून दाखवतील. आपण घटनेबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत.

उत्तम जानकर यांनी या घटनेला श्रीपूर येथील राजे ग्रुप जबाबदार असल्याचे सांगून त्यांनी या ग्रूपच्या बजरंग भोसले, अनिल जाधव, सतिश पवार, गोरख मोहिते, सागर यादव आणि भीमराव रेडे-पाटील या सहा कार्यकर्त्यांची नावे अकलूज पोलिसांकडे दिली आहेत.

चौकशी करू : पोलिस उपअधिक्षक
या दगड फेकीच्या घटनेसंदर्भात आम्ही सखोल चौकशी करू. घटना का घडली व दगडफेक कोणी केली याबाबतची शहानिशा करून संबंधितांवर कारवाई करणार आहोत. डॉ. संजयकुमार पाटील, पोलिस उपअधिक्षक, अकलूज

महापुरूषांचा अपमान
महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळयाशी आमच्या सर्वांच्या भावना जोडलेल्या आहेत. अशा महान कतरुत्वाच्या महापुरूषाबद्दल अपमानास्पद विधान के. के. पाटील यांनी केले आहे. आम्ही याचा निषेध करतो. फायबरचा पुतळा आहे, असा आरोप करणार्‍या के. के. पाटलांनी आपला आरोप सिद्ध करावा. नाही तर पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आहे. भीमराव रेडे-पाटील, महाळुंग